जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विविध पक्ष आणि संघटना

शिंदे सेनेत ९९ टक्के ठेकेदार-महिला जिल्हाध्यक्षांचा आरोप !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)  

  
अहिल्यानगर जिल्ह्यातील एकनाथ शिंदे सेनेत एक टक्का सामाजिक कार्यकर्ते असून ९९ टक्के ठेकेदार असल्याची प्रखर टीका शिंदे सेनच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विमल पुंडे यांनी करून आपला राजीनामा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे पाठवून दिल्याने नगर जिल्ह्यात शिंदे सेनेच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

    

जिल्हाप्रमुख विमल पुंडे यांनी सामाजिक संकेतस्थळावरून प्रसिद्ध केलेले पत्रक.

शिंदे सेनेच्या महिला आघाडीच्या प्रमुख विमल पुंडे यांनी यापूर्वी कोपरगाव नगरपरिषदेत नगरसेविका म्हणून काम केले आहे.शिवसेनेच्या कोपरगाव शहर प्रमुख,तालुका प्रमुख,जिल्हा प्रमुख आदी महत्वाच्या पदावर काम केले असून त्या आजही योगशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले असून आरोग्य दुत,वुमेन्स हेल्थ आयकॉन,योग सम्राद्नीं आदींचा समावेश आहे.त्यांच्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे.

  अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना (शिंदे गट) पक्षात कार्यकर्त्यांच्या वानवेबाबत किंवा संघटनेच्या विस्ताराबाबत विविध राजकीय चर्चा सुरू असतात.पक्ष फुटल्यानंतर जिल्ह्यात काही ठिकाणी ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न झाले असले,तरी स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत समन्वय,जुने-नवे कार्यकर्ते यांचा मेळ घालणे आणि प्रभाव टिकवून ठेवण्याबाबत राजकीय वर्तुळात नेहमी उलट सुलट चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळाले आहे.काही महिन्यापूर्वी उद्योग मंत्री उदय सावंत यांनी श्रीरामपूर भेटीत पक्ष संघटना विसर्जित केली असून प्रभारी पदाधिकारी नेमले होते.मात्र त्यानंतर भाकरी फिरवली असल्याचे दुर्दैवाने दिसून आले नाही.त्याची जोरदार चर्चा नगर जिल्ह्यात झाली होती.शिवसेनेत फूट पडल्यानंतर जिल्ह्यात शिंदे गटाने पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला,परंतु तळागाळातील कार्यकर्त्यांचे जाळे विस्तारताना काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये अजूनही सुसंवादाचा अभाव असल्याचा सूर वारंवार उमटतो.जिल्ह्यात महायुतीमधील इतर पक्ष (भाजपा किंवा राष्ट्रवादी) आणि महाविकास आघाडी (ठाकरे गट व काँग्रेस) यांच्याशी असलेली तीव्र स्पर्धा कार्यकर्त्यांवर प्रभाव पाडत असल्याचे दिसून येत आहे.स्थानिक कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन पक्ष संघटन वाढवणे आणि आगामी निवडणुकांच्या तोंडावर पकड निर्माण करणे हे शिंदेंच्या शिवसेनेसमोर मोठे आव्हान असताना त्याबाबत नाव घेण्यासारखे काम करताना दुर्दैवाने कोणीही दिसून येत नाही.अनेक जण फक्त आपल्याला फुकटचे आर्थिक घबाड कसे मिळेल या विवंचेत असल्याचे दिसून येत आहे.अनेक नवीन आणि हितेशी कार्यकर्त्यांची यामुळे मोठी गोची होताना दिसून येत आहे.त्यामुळे वरिष्ठ नेते नाराज असल्याच्या बातम्या असताना कोपरगाव येथील महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विमल पुंडे यांनी आपला राजीनामा दिल्याने आणि घोळ वाढला असल्याचे दिसून येत आहे.

शिंदे सेनच्या राजीनामा दिलेल्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विमल पुंडे.

   त्यांनी दिलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे की,”आपण सन-१९८३ पासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या प्रभावातून आज पर्यंत शिवसेनेचे काम करत आहे.आज आम्ही शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आहोत.कारण शिर्डी लोकसभा मतदारसंघात बाळासाहेब ठाकरेंचा विचार शिल्लक राहीला नाही.पक्ष वाढीसाठी पक्षाकडून भरीव आर्थिक पाठबळ दिले जात आहे.पण त्यातून पक्ष तर वाढला नाही.गटबाजी आणि राडेरोडे मात्र खूप वाढले आहेत.वर्तमानात या पक्षात १ टक्का सामाजिक कार्यकर्ते आणि ९९ टक्के ठेकेदार पदाधिकारी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.स्वार्थासाठी अनेक पक्ष फिरुन आलेल्या सार्वजनिक जीवनात आरोप होत असलेल्या अनेक अपात्र व्यक्ती येथे आपल्या स्वार्थासाठी जमल्या आहेत.विशेष म्हणजे त्यांना वरिष्ठांकडूनही पाठबळ मिळत आहे.आम्हा महिलांना अशा लोकांबरोबर यापुढे काम करणे शक्य नाही.गुणवत्तेपेक्षा पात्रता नसलेल्या व्यक्तींचा जेथे वरचष्मा आहे,तिथे काम करण्याची अपेक्षा ठेवणे मनाला त्रासदायक ठरू शकते.अशा वेळी स्वतःचा स्वाभिमान जपत शांतपणे दूर राहणे हा देखील एक योग्य निर्णय असू शकतो.परिणामी आम्ही आमच्या महिला आघाडी पदांचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवत आहोत”असे शेवटी म्हटले आहे.सदर पत्रावर महिला आघाडीच्या प्रमुख व योग शिक्षिका विमल पुंडे,शहर संघटिका कमल नरोडे,उपशहर प्रमुख उर्मिला लोळगे,विभाग प्रमुख रुपाली महाडिक,प्रिती शिंदे आदींच्या सह्या आहेत.विमल पुंडे यांच्या राजीनाम्यामुळे शिंदे सेनेत स्वार्थासाठी कार्यरत असलेल्या ठेकेदार मानसिकतेच्या आणि गुळाच्या भेलीला चिकटलेल्या नेत्यांना घाम फुटला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close