कृषी विभाग
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी संस्थानने दिली..ही सुविधा!

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्यासाठी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था,शिर्डी यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून नामांकित आकाश इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी (MHT-CET) कोचिंग उपक्रमाचा विस्तार करत संस्थानने आता महाराष्ट्र राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या गुणवंत पाल्यांसाठी ही सुविधा पूर्णतः मोफत आणि निवासी स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.

या योजनेंतर्गत इयत्ता दहावीच्या परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत निवासी एमएचटी-सीईटी कोचिंगचा लाभ दिला जाणार आहे.संस्थानच्या वतीने विद्यार्थ्यांच्या निवास,भोजन आणि प्रशिक्षणाची संपूर्ण जबाबदारी उचलण्यात येणार असून,श्री साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय,शिर्डी येथे सुरू असलेल्या आकाश इन्स्टिट्यूटच्या अनुभवी तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन दिले जाणार आहे.
आर्थिक अडचणी आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधींपासून वंचित राहावे लागते.ही बाब लक्षात घेऊन संस्थानने सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम सुरू केला आहे.या योजनेंतर्गत इयत्ता दहावीच्या परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत निवासी एमएचटी-सीईटी कोचिंगचा लाभ दिला जाणार आहे.संस्थानच्या वतीने विद्यार्थ्यांच्या निवास,भोजन आणि प्रशिक्षणाची संपूर्ण जबाबदारी उचलण्यात येणार असून,श्री साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय,शिर्डी येथे सुरू असलेल्या आकाश इन्स्टिट्यूटच्या अनुभवी तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन दिले जाईल.तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी आवश्यक असलेल्या आधुनिक सुविधा आणि अभ्यासपूरक वातावरणही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी श्री साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय,शिर्डी येथे प्रवेश घेणे आवश्यक राहणार आहे.या योजनेमुळे राज्यातील गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग,फार्मसी आदी तांत्रिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांची प्रभावी तयारी करण्याची संधी मिळणार असून त्यांच्या करिअरला नवी दिशा मिळण्यास मदत होणार आहे.या उपक्रमाचा जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा,असे आवाहन श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था,शिर्डी यांच्या वतीने शेवटी करण्यात आले आहे.


