लोकसभा कामकाज
कृषी शिक्षण सुधारणा बाबत केंद्र सकारात्मक-..या नेत्याची माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी कृषी शिक्षणात आवश्यक सुधारणा करून ते अधिक आधुनिक,तंत्रज्ञानाधारित व उद्योगाभिमुख करण्याबाबत केंद्र सरकारकडे केलेल्या मागणीची दखल घेत केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

“राष्ट्रीय कृषी शिक्षण मान्यता मंडळ व भारतीय कृषी संशोधन परिषद यांच्या माध्यमातून कृषी शिक्षणात व्यापक सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.अभ्यासक्रम अद्ययावत करणे,संशोधन व नवकल्पनांना प्रोत्साहन देणे तसेच कृषी क्षेत्रातील बदलत्या गरजांनुसार शिक्षण प्रणाली सक्षम बनविण्यावर केंद्र सरकार भर देत आहे”-शिवराजसिंह चौहान,केंद्रीय कृषी मंत्री.
खा.वाकचौरे यांनी कृषी विद्यापीठे व कृषी शिक्षण व्यवस्थेत अभ्यासक्रम अधिक अद्ययावत करण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान,डिजिटल शेती,कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), GIS, रिमोट सेन्सिंग यांसारख्या तंत्रज्ञानाचा समावेश करण्याची मागणी केली होती. तसेच कृषी पदवीधरांना अधिक रोजगारक्षम बनविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण व कौशल्य विकासावर भर देण्याची आवश्यकता त्यांनी पत्राद्वारे केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिली होती.

या संदर्भात केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पाठविलेल्या पत्रात सांगितले आहे की,”राष्ट्रीय कृषी शिक्षण मान्यता मंडळ (NAEAB) व भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) यांच्या माध्यमातून कृषी शिक्षणात व्यापक सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.अभ्यासक्रम अद्ययावत करणे,संशोधन व नवकल्पनांना प्रोत्साहन देणे तसेच कृषी क्षेत्रातील बदलत्या गरजांनुसार शिक्षण प्रणाली सक्षम बनविण्यावर केंद्र सरकार भर देत आहे.याशिवाय कृषी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण,उद्योगांशी समन्वय,उद्योजकता विकास आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे ज्ञान देण्यासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचेही केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी केंद्र सरकारने या विषयाची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले असून,कृषी शिक्षण अधिक सक्षम आणि स्पर्धात्मक बनविण्यासाठी पुढील काळातही सातत्याने पाठपुरावा केला जाईल,असे त्यांनी शेवटी सांगितले आहे.



