धार्मिक
शिर्डी संस्थान अध्यक्षांस राज्यमंत्री पदाचा दर्जा!
न्यूजसेवा
शिर्डी-(प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांना राज्य सरकारने नुकताच राज्यमंत्री पदाचा दर्जा बहाल केला आहे. राज्याच्या विधी व न्याय विभागाने या बाबत नुकताच आदेश पारित केला आहे.त्यानुसार आ.काळे यांना आजपासून म्हणजेच १९ जानेवारी २०२२ पासून राज्यमंत्री पदाचा दर्जा प्राप्त झाला असून त्यांच्या समर्थकांनी कोपरगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला आहे.
राज्याच्या या शासन आदेशानुसार आ.काळे यांना राज्यमंत्र्याच्या सर्व सोयी सुविधा,मानधन,कार्यालय,शासकीय वाहन व अधिकारी कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा खर्च श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या निधीमधून करण्यात येणार आहे.
आ.काळेंना राज्यमंत्री पदाचा दर्जा प्राप्त झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे तसेच पक्षाच्या वरिष्ठ व जिल्हा स्तरीय नेत्यांकडून कार्यकर्त्यांकडून त्यांचं फटाके फोडून व गुलाल उधळून अभिनंदन केलं जात आहे.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या अध्यक्षपदासोबत राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिल्याबद्दल आ.काळेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष पद्मविभूषण शरद पवार व महाविकास आघाडी सरकारचे मनःपुर्वक आभार व्यक्त केले आहे.