विविध पक्ष आणि संघटना
लिंगायत समाज आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करणार-आश्वासन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील १ कोटीच्यावर लोकसंख्या असलेला सकल लिंगायत समाज या संघटनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व समाज संघटना एकत्रित करून आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य लिंगायत संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक ओमप्रकाश कोयटे यांनी दिली आहे.
“लिंगायत समाजाच्या अनेक संघटना राज्य भर कार्यरत असून या संघटनांनी आप-आपल्या पातळीवर चांगले काम करावे.वरील पाच विषयांबाबत लिंगायत समाजाचे विविध पक्षात कार्यरत असलेल्या समाज बांधवांमार्फत शासन दरबारी प्रयत्न करण्याची व गरज वाटल्यास सामुदायिकरित्या आंदोलनाचे देखील पाऊल उचलण्यात येईल”-ओमप्रकाश कोयटे,मुख्य समन्वयक,महाराष्ट्र राज्य लिंगायत संघर्ष समिती.
पुणे येथील सुहाग मंगल कार्यालयात महाराष्ट्र राज्य लिंगायत संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक ओमप्रकाश कोयटे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली त्यावेळी हा इशारा दिला आहे.
या बैठकीस लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील नामदेव रुकारी,कार्याध्यक्षा सरला पाटील,लिंगायत महासमितीचे अध्यक्ष प्रा.सुदर्शन बिराजदार,लिंगायत सेवा संघाचे अध्यक्ष विजयकुमार शेटे,महाराष्ट्र बसव परिषदेचे अध्यक्ष शिवानंद हैबतपुरे,राष्ट्रसंत मिशनचे अध्यक्ष रामदास पाटील,जागतिक लिंगायत महासभेचे अध्यक्ष बसवराज कनजे या शिवाय बसवेश्वर स्मारक समितीचे प्रमुख बसवराज बगले,शिवलिंग ढवळेश्वर,भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या प्रेरणा होनराव,निशा बिडवे,पुणे येथील काँग्रेस प्रवक्ते नरेंद्र व्यवहारे,संभाजीनगर येथील शिवसेनेचे नेते ज्ञानेश्वर खरडे,शिवा खांडकुळे तसेच नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष अनिल चौगुले,कागलचे नगरसेवक संजय चितारी,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संतोष जिरेसाळ,आम आदमी पार्टीचे नरेंद्र देसाई,लिंगायत संघर्ष समितीचे उपाध्यक्ष राजाभाऊ मुंडे,गुरुनाथ बडूरे,नाशिक विभागीय अध्यक्ष चंद्रशेखर दंदणे,पुणे जिल्हा अध्यक्ष केशवराव नगरे,नाशिक जिल्हा अध्यक्ष संदीप झारेकर आदी उपस्थित होते.
या बैठकीत खालील प्रमाणे किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आला असून त्यात लिंगायत समाजातील सर्व पोट जातींना ओबीसी आरक्षण मिळावे,जगदज्योती महात्मा बसवेश्वरांची कर्मभूमी असलेल्या मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वरांचे स्मारक उभारावे,त्यासाठी किमान ५०० कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून द्यावा,लिंगायत समाजाच्या आर्थिक विकासासाठी आर्थिक महामंडळ तयार करून त्यास निधी उपलब्ध करून द्यावा,लिंगायत समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा पातळीवर वसतीगृहे बांधावीत,लिंगायत स्मशानभूमीसाठी नव्याने जागा उपलब्ध करून देत सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
सदर बैठकीचे सुत्रसंचलन लिंगायत समितीचे महासचिव भगवान कोठावळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार युवक आघाडीचे अध्यक्ष प्रदीप साखरे यांनी मानले आहे.