कृषी विभाग
शासनाने वाया गेलेल्या खरीप पिकांचे पंचनामे करावे-कोपरगावातून मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
संपूर्ण राज्यात महापूरसदृष्य परिस्थिती निर्माण झालेली असताना नाशिक,अहमदनगर,औरंगाबाद जिल्हयात मात्र गेल्या एक ते दीड महिन्यापासून पाऊसच झाला नसल्याने खरीप हंगामातील पिके वाया गेली आहेत. शासनाने या नुकसानग्रस्त खरीप पिकांची पाहणी करुन पंचनामे करावेत आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
“पावसाच्या हुलकावणीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीच्या संकटातून बाहेर काढण्याशिवाय आता दुसरा पर्याय नसल्याने या परिस्थितीचे गांभिर्य विचारात घेवून वाया गेलेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांना तसेच महसूल विभागास देवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी”-राजेश परजणे.अध्यक्ष गोदावरी तालुका दूध उत्पादक संघ.
या वर्षीच्या पावसाळ्यात सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी कापूस,सोयाबीन,बाजरी,मका,मूग,भूईमूग,तूर,कांदा,भाजीपाला आदी खरीप पिके घेतली. पिकांची उगवणही चांगली झाली होती. यंदा खरीप हंगाम चांगली साथ देईल या आशेवर शेतकरी समाधानी होते. परंतु त्यांनतर पावसाने दीड महिन्यापासून ओढ दिल्याने हाता तोंडाशी आलेली सर्वच खरीप पिके सुकून गेली. पाटबंधारे विभागाने गोदावरी डाव्या व उजव्या कालव्याद्वारे
सोडलेली आवर्तने फार काळ चालली नाहीत. ती लगेच बंद केल्यामुळे खरीप पिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळाले नाही. सद्या लाभक्षेत्रातील विहीरी व कुपनलिका कोरड्या पडल्याने पाण्याची उपलब्धता होऊ शकली नाही. पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. बियाणे खरेदीसाठी तसेच किटकनाशक औषधे, मजुरी यासाठी झालेला खर्चही निघून येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यात अजुनही पावसाचा अंदाज नसल्याने येणारा रब्बी हंगामही वाया जातो की काय अशी भिती शेतकऱ्यांमध्ये पसरली आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे संपूर्ण आर्थिक नियोजन कोलमडल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.
पावसाच्या हुलकावणीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीच्या संकटातून बाहेर काढण्याशिवाय आता दुसरा पर्याय नसल्याने या परिस्थितीचे गांभिर्य विचारात घेवून वाया गेलेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांना तसेच महसूल विभागास देवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशीही मागणी श्री परजणे यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे.