कृषी विभाग
…या शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव मतदार संघातील पोहेगाव,रवंदे,दहेगाव बोलका,सुरेगाव व कोपरगाव या पाच महसूल मंडळातील डाळिंब उत्पादक शेतकरी पिक विम्याच्या रक्कमेपासून वंचित होते.या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विम्याची रक्कम मिळावी यासाठी आ.आशुतोष काळे यांचा कृषी मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरु होता.त्या पाठपुराव्याची दखल घेवून कृषी मंत्रालयाने विमा कंपनीला आदेश दिल्यामुळे सबंधित विमा कंपनीकडून डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना डाळिंब फळपिक विम्याची रक्कम देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
कोपरगाव मतदार संघातील एकूण पाच महसूल मंडळातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडून डाळिंब फळ पिकाचे विमे उतरविण्यात आले होते.मागील वर्षी कमी पर्जन्यमान झाल्यामुळे इतर खरीप पिकांबरोबर डाळिंब पिकांचे देखील मोठे नुकसान झाल्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी पिक विमा रक्कमेच्या प्रतीक्षेत होते.या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विम्याची रक्कम मिळावी यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे कोपरगाव मतदार संघातील पोहेगाव,रवंदे,दहेगाव बोलका,सुरेगाव व कोपरगाव या पाच महसूल मंडळातील एकूण ४४६ डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना १ कोटी २३ लाख ६४ हजार ९२१ रुपये हवामान अधारीत डाळिंब फळ पिकविम्याची रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
हि डाळिंब फळ पिकविम्याची रक्कम पिक विमा कंपनीने सबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात देखील केली आहे. येत्या काही दिवसात डाळिंब फळ पिकविम्यास पात्र असणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हि रक्कम जमा होणार आहे.त्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहे.