जाहिरात-9423439946
संपादकीय

उत्तर नगरमध्ये विखे-थोरातांचे नेहमीचेच अर्थहीन गारुड !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव(प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यास काही दिवासाचाच अवधी राहिला असताना उत्तर नगर जिल्ह्यातील दोन मातब्बर गणले गेलेले आजी-माजी मंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्यात पाडापाडीचा सामना रंगणार असे सार्वत्रिक चित्र निर्माण होऊ पाहत आहे.मात्र ते सर्वस्वी खरे मानता येणार नाही.विदर्भातील दोन रेड्यांच्या टकरीत जसे दिवसभर कोणीच जिंकतही नाही आणि हारतही नाही मात्र ज्याच्या शेतात हा खेळ चालतो त्याचे मात्र वाटोळे झाल्याशिवाय राहत नाही तसे या लढाईकडे पाहिले पाहिजे.
आगामी विधानसभा निवडणूक गृहीत धरून व आपल्या संस्थानाला धक्का लागू नये या पार्श्वभूमीवर भाजपात प्रवेश केलेले गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात या दोन नेत्यांमध्ये असणारा राजकीय संघर्ष विधानसभा निवडणुकीत चांगलाच पेटण्याची चिन्हे वर्तीवला जात आहे.राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात काँग्रेसने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली असली तरी त्याची सुरुवात लोकसभा निवडणुकीतच झालेली आहे.एप्रिल २०१९ मध्ये संपन्न झालेल्या या निवडणुकीत दोघांनीही एकमेकांच्या मतदारसंघात जाऊन एकाच पक्षात असताना एकमेकास दंडाच्या बेटकुळ्या दाखवल्या आहेत.सदर निवडणुकीत आ. बाळासाहेब थोरात यांना कमी मते मिळाल्याने विखे यांचा आत्मविश्वास वाढला असल्याचे दिसत असले तरी ते पूर्णतः खरे मानणे मूर्खपणाचा कळस ठरणार असल्याचे प्रथम दर्शनी दिसते.कारण राजकारणात कधीच एक निवडणूक दुसऱ्या निवडणूकीसारखी असत नाही.हे सूत्र ज्याला समजले त्याला या पिपाण्या ऐकून काही फरक पडणार नाही.एक मात्र खरे आहे की ,वर्तमान राजकीय आसमंतात सध्या भाजपचे वारे जोरात वाहत आहे.त्यामुळे थोरातांना मिळणाऱ्या मतात घट जरूर होऊ शकते.त्याला जसे भाजपचे वर्तमान धूपारे कारणीभूत असले तरी दुसरे कारण निळवंडे कालव्यांची रखडलेली कामे हे ठोस कारण आहे.व हे कारण केवळ थोरात यांनाच लागू पडत नाही.त्यांनी किमान अडतीस वर्षानंतर धरणाची भिंत बांधली.पण जे संगमनेरात येऊन शहाणपणाच्या गोष्टी सांगत असतील तर हे जरा अतीच झाले असे म्हटले पाहिजे.या मागे अर्थातच धनिका घरचे श्वान जसे स्वतःला मिरवून घेण्यात धन्यता मानते तद्वतच काहीशी परिस्थिती भाजपात गेलेल्या नेत्यांची झाली असल्याचे दिसते.कारण यांचा असा कोणता पुरुषार्थ आहे की जनतेला ताट मानेने सांगता येईल व बोटाने दाखवता येईल.जे एका पक्षात असताना जिल्हा विभाजन करू शकले नाही.विमानतळाच्या भूसंपादनाचा प्रश्न सोडवू शकले नाही. जे उत्तर नगर जिल्ह्याचा बारामाही शेती सिंचनाचा प्रश्न सोडवू शकले नाहीत.की गोदावरीचे तुटीच्या खोऱ्यात पाश्चिमेचे समुद्राला वाहुन जाणारे पाणी वळवू शकले नाहीत.इंग्रजांनी येथे होणारे भूकबळी थांबविण्यासाठी निर्माण केलेले पाणी हे वाचवू शकले नाही.की वाढवू शकले नाही.त्यांच्यापासून मतदारांनी कोणती अपेक्षा ठेवायची ? निळवंडेच्या लाभक्षेत्रात १८२ गावांपैकी सर्वाधिक ८० गावे हि एकट्या संगमनेर तालुक्यातील आहेत. तशी राहाता तालुक्यातही ३७ गावे अद्यापही तुषार्त आहेत हे याना कोणी सांगायचे ? सांगूनही ज्यांनी ४८ वर्ष झोपेचे सोंग घेतले त्यांना कोणी उठवायचे ? हा पुढला प्रश्न निर्माण होणार आहे.हा प्रकल्प रखडविण्यात सर्वाधिक दोषी हे विखे घराणे आहे.हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.त्यांनी कितीही अस्रु आणले तरी ते वास्तव नाही. त्याचे पितळ निळवंडे कालवा कृती समितीने माहिती अधिकारात वेळोवेळी उघड केले आहे.या प्रकल्पास रखडविण्यास तसे उत्तर नगर जिल्हयातील सर्वच राजकीय पंचमहाभूते कारणीभूत आहे.त्यांनी या प्रकल्पाचा वापर केवळ मते मिळविण्याचे यंत्र म्हणूनच केला आहे.त्याला दस्तूर खुद्द केंद्रीय जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी यांनीच पुरावा दिला आहे.एका दौऱ्यात त्यांनी एका-एका सिंचन प्रकल्पाला वीस ते तीस वर्षे लावणारे (अर्थात निळवंडेला ४८ वर्ष उलटून गेले आहेत हा भाग अलाहिदा) नगर इतके रद्दाड नेते राज्यात कुठेच नाही असे जाहीर सांगून या नेत्यांचे जाहीर वस्रहरण केले असून भाजपात प्रवेश करणाऱ्या नेत्यांना तर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत पुण्यातील एका कार्यक्रमात या दलबदलू नेत्यांची उरलीसुरली उतरून टाकली आहे.तरीही हि मंडळी मानभावीपणाचा आव आणत असतील तर या निर्लज्जपणाला इलाजच नाही म्हणायचा!गेली ४८ ज्या शेतकऱ्यांचे प्रपंच उध्वस्त केले त्यांना फक्त प्रलोभने दाखवले व पुढची निवडणूक काढून घेतली असे करत-करत आपल्या संस्थानात मात्र गडगंज संपत्तीची मिळवली आज त्यावर वेटोळे घालून बसले आहे.या संपत्तीचे संरक्षण हा त्यांच्या कार्याचा अग्रक्रम बनलेला असताना ते आव जनसेवेचा आणत असले तरी बहुतांशी जनता त्यांना ओळखून चुकली आहे.तरीही त्याचे रूपांतरण प्रत्येक निवडणुकीत होत नाही ही खरी गोम आहे.त्याला कारण हे जनतेत निवडणूक काळात निर्माण होणारा लोभ हे आहे.जो लोभामुळे व आपली बुद्धी हरवून बसतो तो चांगल्या विचारांना मुकतो आणि आपले स्वातंत्र्य हरवून बसतो.या दुष्काळी गावातही नेमकी हीच स्थिती झाली आहे.परिणाम असा होतो की पारतंत्र्यात गुणांऐवजी अवगुणांना जनता स्वीकारून आपल्या पायावर धोंडा पडून घेते या दुष्टचक्रात दुष्काळी भागातील जनता पिचलेली आहे.एखाद्या रोग्याला औषध आवडत नाही त्यावेळी त्याचे मरण जवळ आले असे समजले जाते.तसेच अजूनही या भागातील जनतेत गुलामीच आपले प्रारब्ध मानणारे बरीच बेरकी मंडळी असल्याने या मंडळींचे फावते.यांच्या बायकांच्या कपाळाचे कुंकू पुसले गेले,हातातील बांगड्या फुटल्या तरी ही मंडळी त्यातून बोध घेण्याची सुतराम चिन्हे दिसत नाही.बांगडया जरी फुटल्या पण मनगटातील कर्तृत्व संपलेले नाही हे यांना कानी कपाळी समजून सांगण्याची गरज आहे.महात्मा ज्योतिबा फुलेंनी इंग्रज राजवटीत सामाजिक आणि राजकीय गुलामगिरीविरुद्ध लढा दिला तो यशस्वी झाला पण आता आपल्याच काळ्या इंग्रजांनी हि जी आर्थिक गुलामगिरी आणली त्या बाबत कोणी बोलणार आहे की नाही ? हा खरा प्रश्न आहे.आणि या दोन्ही सत्ता याच मानसिकतेच्या प्रतीक आहे.हे एकदा समजले की पुढचे राजकीय समीकरणे समजणे सोपे जाते.आता हेच पहा ना.कधी काळी निवडणूक आली की,निळवंडेवर आपले पोट चालवणारी टोळी म्हणून ज्या आ. बाळासाहेब थोरातांनी गत दिड वर्षांपूर्वी हाकलून दिले होते त्याचीच मदत घेण्याची नामुष्की त्यांच्यावर यावी याला काय म्हणावे ? हि टोळी एप्रिल मध्ये संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत ना.राधाकृष्ण विखे व खा.सदाशिव लोखंडे यांचे ढोल बडवीत होती ती आता आ. बाळासाहेब थोराताच्या पहिल्याच राजकीय दौऱ्यात सतरंज्या उचलायला सर्वात पुढे आहे.त्यांचीच “ब” टोळी संगमनेर तालुक्यात निर्णय यात्रा काढून याच आ. थोरातांना पराभूत करायला टपली आहे नव्हे तशी गावोगावी फ्लेक्स लावून कार्यप्रवण झाली आहे.याला तुम्ही काय म्हणणार ? ज्या कासारे गावाने निष्क्रिय राजकीय नेत्यांना प्रवेश बंद केला तेथे फूट पाडून जनतेची मोठी हाणी करणारे दिवटे या प्रकल्पाचे पाणी आम्हीच आणणार हे कोणत्या तोंडाने सांगतात हे कळायला मार्ग नाही.या सर्व गोष्टी समाजजीवनाचा तोल ढळला गेल्याची व तत्वांना ग्लानी आल्याची लक्षणे मानायला हरकत नसावी.याच कारणाने या दांभिक राजकारण्यांचा पराभव करणे अवघड बनते.याला मराठीत एक म्हण तिला,” कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ.”म्हणतात .समाजाची प्रकृती बिघडणे,संतुलन ढळणे त्याला अराजकतेचे आचके बसणे हे तसे स्वाभाविक मानले पाहिजे.पण त्यातून ग्लानी आलेल्या समाजाला सावरणे या बाबी समाजधारणेसाठी अत्यंत आवश्यक आहे मात्र त्याला याच दुष्काळी भागातील घरभेदी साथ देत असतील तर पुन्हा थोरात आणि विखे त्यांच्या मतदारसंघात निवडून आले तर आश्चर्य वाटावयास नको.हि लढाई म्हणजे आगामी काळाची पावले ओळखून कोणताही विधिनिषेध न बाळगता आपापली संस्थाने राखण्याचे प्रमुख डावपेच म्हणून याकडे पाहिले पाहिजे.यात सामान्य जनतेला कुठलाही फायदा होणार नाही.या राजकीय साठमारीत सामान्यांना अडचणीत ठेवणे यातच त्यांच्या यशस्वी राजकारणाची बीजे दडली आहेत हे ज्या दिवशी मतदारांना समजेल तो सुदीन !

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close