Uncategorized
इम्रान खानने गुंडाळले शेपूट
इस्लामाबाद – केंद्रातील मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यापासून भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानने आता आपले शेपूट गुंडाळल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दोन्ही देशांमध्ये असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान कधीही भारताविरोधात युद्धाची सुरूवात करणार नसल्याचे म्हटले आहे.
आम्ही कधीही युद्धाची सुरूवात करणार नाही. पाकिस्तान आणि भारत हे दोन्ही देश अण्वस्त्र संपन्न असून संपूर्ण जगाला दोन्ही देशांमधील तणावाचा धोका आहे. भारताला मी सांगू इच्छितो की, कोणत्याही समस्येवर युद्ध हा उपाय ठरु शकत नाही. युद्धात जिंकणाऱ्या देशालाही खूप काही गमवावे लागते आणि अखेरीस तोही पराभूत ठरतो. युद्धामुळे अनेक नव्या समस्यांचा जन्म होत असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे.
इम्रान खान यांनी हे वक्तव्य लाहोरमध्ये शीख समुदायांच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना केले आहे. यापूर्वी पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या फोनवरीच चर्चेचाही मुद्दा खान यांनी यावेळी मांडला. आम्ही अनेकदा भारताशी चर्चेसाठी प्रयत्न करुनही काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर जेव्हा जेव्हा मी भारताशी चर्चेचा प्रयत्न केला भारताने तेव्हा तेव्हा स्वतः सुपरपावर असल्याचा आव आणला आणि तुम्ही असे करा किंवा तसे करा अशाप्रकारचे आदेश उलट आम्हालाच दिले, असे खान म्हणाले.