Uncategorizedनगर जिल्हा
कोपरगाव नगरपरिषदेला नवीन साठवण तलावाचे गांभिर्य नाही- सुनील गंगुले
- कोपरगाव(प्रतिनिधी)कोपरगावच्या नागरिकांना उन्हाळ्यात १५ ते १७ दिवसांनी पाणी पुरवठा होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने या बाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करून व त्यास उत्तर देण्याचे न्यायालयाचे फर्मान होऊनही नगरपरिषद व शासनास कुठलेही गांभीर्य नसल्याची बाब उघड झाली असल्याची टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये केली आहे.
सुनील गंगूले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की,पाण्याच्या टंचाई बाबत वारंवार कोपरगाव नगर परिषदेला निवेदन देऊनही कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही झाली नव्हती. त्यामुळे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ४ व ५ नंबर साठवण तलावाचे काम तातडीने सुरु करावे यासाठी उच्च न्यायालयात नगरसेवक संदीप वर्पे, मंदार पहाडे व माझ्या स्वतः च्या नावे जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे. या याचिकेची सुनावणी सुरु असून उच्च न्यायालयाने कोपरगाव नगर परिषद व शासनाला २३ जुलै रोजी आपले म्हणणे न्यायालयापुढे सादर करण्यास सांगितले होते. परंतु कोपरगाव नगर परिषद व शासनाने उच्च न्यायालयात २३ जुलै रोजी कोणत्याही प्रकारची माहिती सादर केलीच नाही. या धरसोड वृत्तीमुळे कोपरगाव नगर परिषद व शासनाला साठवण तलाव ४ व ५ च्या बाबतीत गांभिर्य नसल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे असे म्हटले आहे की, कोपरगावचा पाणीप्रश्न मार्गी लागावा यासाठी आशुतोष काळे यांनी विविध आंदोलन केली आहेत व वेळोवेळी मुख्याधिकारी ते जिल्हाधिकारी यांना वेळोवेळी भेटून निवेदन दिलेले आहेत. तरीही ४ व ५ नंबर साठवण तलावाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यामुळे कोपरगावच्या नागरिकांसाठी न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेत महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. या जनहित याचिकेची नियमितपणे सुनावणी सुरु आहे. या सुनावणीसाठी आम्ही उच्च न्यायालयात नियमितपणे हजर राहत आहे. परंतु कोपरगाव नगर परिषद, प्रांताधिकारी,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हाधिकारी व शासनाकडून २३ जुलै २०१९ रोजी ४ व ५ नंबर साठवण तलावाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची माहिती सादर केली नाही.
कोपरगाव शहराच्या विकासाचे प्रश्न मार्गी लागावा यासाठी आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांना सहकार्य करण्याच्या सुचना केल्या होत्या. त्या सूचनेनुसार कोपरगाव नगर परिषदेला राष्ट्रवादीचे नगरसेवक सर्वोतोपरी सहकार्य करीत आहे. परंतु नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे अतिशय गंभीर समस्येचे सोयरसुतक कोपरगाव नगर परिषदेला नसल्यामुळे आजपर्यंत ४ व ५ नंबर साठवण तलावाच्या बाबतीत नेहमीच उदासीनता दाखविली आहे. कोपरगाव नगरपरिषदेला ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी त्यांनी न्यायालयापुढे मांडून त्यांची सोडवणूक करणे गरजेचे असतांना सुनावणीच्या वेळी आपले म्हणणे आजपर्यंत मांडले नाही. यावरून पाण्याच्या प्रश्नाबाबत कोपरगाव नगरपरिषद व शासनाला गांभिर्यच नसल्याचे सिद्ध होत आहे. ज्याप्रमाणे ५ नंबर साठवण तलावाच्या बाबतीत गायत्री कंस्ट्रक्शन कंपनीवर राजकीय दबाव टाकून हे काम प्रलंबित ठेवले गेले त्याचप्रमाणे या न्यायालय प्रक्रियेतही राजकीय दबाव आला असावा असे म्हणण्यास वाव मिळत आहे असे सुनील गंगुले यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात शेवटी म्हटले आहे.