आरोग्य
शिर्डीत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प लोकार्पण
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी संचलित रुग्णालयात रिलायन्स फाऊंडेशन व के.व्ही.रमणी यांच्या देणगीतुन उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प लोकार्पण व आरटी-पीसीआर लॅबचे कार्यान्वयन चाचणी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले आहे.
हा ऑनलाईन उदघाटनचा कार्यक्रम दुरदृष्य (Zoom meeting) प्रणालीवर दुपारी १२.१५ वाजता संस्थानच्या साईसभागृहात आयोजित करण्यात आला होता.
यावेळी राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ, सार्वजिनक आरोग्य मंत्री राजेश टोपे, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे,राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे,जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले आ.आशुतोष काळे,आ. लहू कानडे, आ. रोहित पवार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले,देणगीदार साईभक्त के.व्ही.रमणी व आदीसह रिलायन्स फौंडेशनचे पदाधिकारी आदी मान्यवर ऑनलाईन उपस्थित होते. तर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा.सदाशिव लोखंडे,आ. राधाकृष्ण विखे , प्रांताधिकारी गोविंद शिंदे, शिर्डी नगरपंचायतचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर,संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता रघुनाथ आहेर, श्री साईबाबा हॉस्पिटलचे प्र.वैद्यकीय संचालक डॉ.प्रितम वडगावे, श्री साईनाथ रुग्णालयाच्या अधिक्षीका डॉ.मैथिली पितांबरे व कर्मचारी आदी सभागृहात उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे म्हणाले की, श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी संचलित श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल व श्री साईनाथ रुग्णालय, शिर्डी यांचे अखत्यारीत COVID-१९ पार्श्वभूमीवर शासनाचे निर्देशाप्रमाणे CCC, २) DCHC ३) DCH चालविण्यात येत आहे. १८ मार्च २०२० पासून वरील COVID-१९ चे लक्षण असलेले रुग्ण व लक्षण रहित सुमारे ६९०० इतक्या लोकांना संस्थानकडून उपचार करण्यात आलेले आहेत. संस्थानकडील असलेले Infrastructure व मनुष्यबळ याकामी वापरण्यात आलेले असुन त्यातून लोकांना सेवा मिळून COVID-१९ वर देखील नियंत्रण मिळविण्यात यश आलेले आहे. तसेच सध्या मार्च २०२१ पासून COVID-१९ या रोगाचा प्रार्दुभाव वाढत चाललेला असल्यामुळे त्यावर मात करण्यासाठी व लोकांना अत्यावश्यक सेवा सुविधा देण्यासाठी संस्थानकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे.
सध्या कोरोनाच्या दुस-या लाटेत कोरोनाच्या रुग्णांकरीता मोठयाप्रमाणात आक्सिजनची कमतरता भासत आहे. याकरीता श्री साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात रिलायन्स फाऊंडेशनचे अनंत अंबानी यांच्या ०१ कोटी ८८ लाख ८० हजार व दानशुर साईभक्त श्री.के.व्ही.रमणी यांच्या ४४ लाख ९४ हजार अशा एकुण ०२ कोटी ३३ लाख ७४ हजार रुपये देणगीतुन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आणि संस्थानच्या वतीने आरटी-पीसीआर लॅब उभारण्यात आलेली आहेत. या प्रकल्पाद्वारे हवेतुन ऑक्सिजन निर्मिती केली जाणार असुन सदर प्लॅन्टची क्षमता १२०० (LPM Liter Per Minute) असुन त्याद्वारे साईनाथ रुग्णालयातील ३०० Bed करीता ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे. सदर प्रकल्प पर्यावरण पुरक असुन तो २४ तास कार्यरत राहणार आहे. तसेच एखादया व्यक्तीला कोरोना संसर्ग झाला आहे हे शोधून काढण्यासाठी चाचणी हा एकमेव पर्याय आहे. या चाचणीचे निष्कर्ष जर लवकर प्राप्त झालेतर त्यामुळे वाढणारा संसर्ग नियंत्रित करण्याचा प्रयत्न करण्यास मदत होते. त्यासाठी वेगवेगळया चाचण्या उपलब्ध आहेत. RT-PCR Test ही कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही हे खात्रीशीर पध्दतीने समजू शकते. यामध्ये व्यक्तींच्या नाकातील घशातील स्त्राव तपासला जातो. त्यामुळे रुग्णाचे निदान करणे जलद होवुन तातडीने उपचार करता येते. अशा दोन प्रकल्पांचा शिर्डी व पंचक्रोशितील रुग्णांना मोठयाप्रमाणात आरोग्य सेवेचा लाभ होणार आहे. तसेच यामुळे अनेकांचे प्राण वाचविता येतील.
याप्रसंगी मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची भुमी आहे. संताचा मदतीचा वारसा हा अनेकांनी पुढे चालवलेला आहे. त्यातच श्री साईबाबांचा गोरगरीबांना मदत करण्याचा वारसा श्री साईबाबा संस्थानने जपलेला आहे. हे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी केलेल्या कार्यातून आजही दिसून येत आहे. तसेच यापुर्वी कोरोना विषाणुच्या पहिल्या लाटेत श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरीता ५१ कोटी रुपयांची मदत दिलेली आहे. राज्यात आलेल्या कोरोना विषाणुचे संकट खुप मोठे आहे. यात अनेक व्यक्तीं मदतीसाठी पुढे येत असून शासन ही याकरीता खुप शर्तीचे प्रयत्न करत आहे. संस्थानने उभारलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आणि आरटी-पीसीआर लॅबच्या माध्यमातुन खुप मोठी मदत रुग्णांना उपलब्ध होणार आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सामना केल्यानंतर सध्या दुसरी लाट सुरु असून यामध्ये आरोग्य सेवेची मोठी कमतरता भासत आहे. अशावेळी शासनाने मोठयाप्रमाणात आरोग्य सेवा उभ्या केलेल्या आहेत व अजुन ही हे कार्य सुरुच आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव संपल्यावर ही अनेक वर्ष कोरोना चाचणी करणे सामान्यपणे सुरुच ठेवावी लागणार आहे.
तसेच अशा या कोरोनाच्या संकटकाळात श्री साईबाबा संस्थानने केलेले कार्य हे भुषणावह असून इतर देवस्थानांनी ही अशाप्रकारचे कार्य केल्यास खुप मोठी आरोग्य सेवा उभी राहु शकेल, असे सांगुन या दोन्ही प्रकल्पांकरीता देणगी देणारे दानशुर साईभक्तांचे अभिनंदन करुन त्यांच्या आरोग्य व पुढील वाटचालीसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमा प्रसंगी राज्याचे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव सिताराम कुंटे आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करुन या कोरोनाच्या संकटकाळात केलेल्या कार्याबद्दल श्री साईबाबा संस्थानचे अभिनंदन केले आहे.