कोपरगाव तालुका
कोपरगाव पीपल्स बँकेच्या अध्यक्षपदी अतुल काले
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात सहकारी बँकेत अग्रणी असलेल्या कोपरगाव पीपल्स को-आपरेटिव्ह बँकेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड झाली असून अध्यक्षपदी अतुल धनालाल काले यांची तर उपाध्यक्षपदी प्रतिभा शिलेदार यांची निवड झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आर.एल.त्रिभुवन यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
सन १९४८ मध्ये स्थापन झालेल्या या बँकेत २६४ कोटी रुपयांच्या ठेवी असून ११८ कोटी रुपयांचे कर्जवाटप तर गुंतवणूक १५५ कोटी रुपयांची करण्यात आले आहे. सभासदांनी दाखविलेल्या विश्वासास पात्र राहून बँकेच्या अधिकाधिक प्रगतीसाठी प्रयत्न करू, असे आश्वासन बँकेचे नूतन अध्यक्ष अतुल काले यांनी त्यांच्या निवडीनंतर दिले आहे.
नूतन अध्यक्ष अतुल काले हे कोपरगाव नागरपरेषदेचे माजी नगरसेवक व बँकेचे गत दहा वर्षांपासून संचालक आहेत.राजकीय,सामाजिक क्षेत्राचा त्यांचा अनुभव मोठा आहे.त्यामुळे या पदाला ते रास्त न्याय देतील असा विश्वास सभासद व संचालक व जेष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.
कोपरगाव पीपल्स बँकेच्या या आधीचे अध्यक्ष डॉ.विजय कोठारी यांनी व उपाध्यक्ष हेमंत बोरावके यांनी पंधरा दिवसा पूर्वी आपला राजीनामा दिल्याने हे दोन्ही पदे रिक्त झाली होती.त्यामुळे कोपरगाव येथील सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक आर.एल.त्रिभुवन यांनी नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला होता.त्यानुसार हि नूतन पदाधिकाऱ्यांची सहाय्यक निबंधक आर.एल.त्रिभुवन यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. यावेळी अतुल काले यांच्या अध्यक्ष पदाची सूचना संचालक रवींद्र लोहाडे यांनी मांडली तर उपाध्यक्ष म्हणून प्रतिभा शिलेदार यांच्या नावाची सूचना वसंत आव्हाड यांनी मांडली होती त्याला अनुक्रमे धरमचंद बागरेचा व सुनील कंगले यांनी अनुमोदन दिले.या दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकाच अर्ज आल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक बिनविरोध जाहीर केली.
या वेळी जेष्ठ नेते रतनचंद ठोळे,संचालक कैलास ठोळे, एस.डी. कुलकर्णी,कल्पेश शहा, राजेंद्र शिंगी, सुनील बंब,विरेश पैठणकर,,अशोक पापडीवाल, सहकार अधिकारी श्री रहाणे, व्यवस्थापक दीपक एकबोटे,उपव्यवस्थापक जितेंद्र छाजेड आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.