कोपरगाव तालुका
मुस्लिम कब्रस्तानसाठी निधी द्या – आ. आशुतोष काळे
संपादक नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम कब्रस्तान व ख्रिश्चन दफनभूमी परिसराच्या विकासासाठी निधी द्या अशा आशयाचे निवेदन आ. आशुतोष काळे यांनी अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांची त्यांच्या दालनात भेट घेवून निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात आ.आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की, कोपरगाव विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावांमध्ये मुस्लीम व ख्रिश्चन कुटुंबाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. माजी आ.अशोक काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात मतदार संघातील विविध गावातील मुस्लिम कब्रस्तान व ख्रिश्चन दफनभूमीसाठी निधी आणून विकास साधला आहे.
कोपरगाव तालुक्यातील अनेक गावातील मुस्लिम कब्रस्तान व ख्रिश्चन दफनभूमीमध्ये सोयी-सुविधांचा अभाव आहे. अनेक ठिकाणी जाण्यासाठी रस्त्याची सुविधा नाही. शाश्वत पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नाही.स्वच्छतागृह नाही.अंतर्गत रस्ते नाही.कित्येक ठिकाणी वीज नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अंधारातच अंत्यविधी उरकावे लागतात. बहुतांश मुस्लिम कब्रस्तान व ख्रिश्चन दफनभूमीच्या ठिकाणी संरक्षक कम्पाउंड नसल्यामुळे कुत्रे, मांजर आदी पाळीव तसेच जंगली प्राण्यांकडून मृतदेहाची विटंबना होवून धार्मिक भावना दुखावल्या जावू शकतात.त्यासाठी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील मुस्लिम कब्रस्तान व ख्रिश्चन दफनभूमीच्या आवश्यक त्या ठिकाणी संरक्षक कम्पाउंड, वीज व्यवस्था, पाणी पुरवठा व रस्ते करून रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे बसविणे आदी कामांसाठी भरघोस निधी मिळावा. मुस्लिम कब्रस्तान व ख्रिश्चन दफनभूमीचे पावित्र्य टिकून राहावे यासाठी तसेच मुस्लीम व ख्रिश्चन कुटुंबाची होत असलेल्या अडचणींची आपण गंभीरपणे दखल घेवून तातडीने निधी द्यावा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.