कोपरगाव तालुका
अमेरिकास्थित लताताई शिंदे यांच्याशी विद्यार्थ्यांनी साधला संवाद
संपादक नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी नुकताच कोपरगाव तालुक्याचे माजी आ. अशोकराव काळे यांच्या लॉस एंजल्स अमेरिका येथील भगिनी लताताई शिंदे यांच्याशी जि.प. प्राथमिक शाळेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ग्लोबल नगरी उपक्रमांतर्गत मोठ्या उत्साहात संवाद साधला आहे.
यावेळी लताताई शिंदे यांनी इयत्ता पहिली ते पाचवी च्या विद्यार्थ्यांना अनेक शाळेविषयी, शिक्षणाविषयी अनेक प्रश्न विचारले असता विद्यार्थ्यांनी सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे त्यांना दिली. तसेच शिंदे यांनी अमेरिकेतील सुविधा, अमेरीकेतील शेती, व्यवसाय, उद्योगधंदे, आरोग्य विषयक सुविधा, शिक्षण, अमेरिकेतील व्यवस्थापन कारभार याविषयी विद्यार्थ्यांनी त्यांना माहिती विचारली. त्यावेळी त्यांनी सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्याचप्रमाणे अमेरिकेतील जीवनमान, तेथील लोकांच्या उपजीविके विषयीची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. सर्व विद्यार्थ्यांनी शिंदे यांच्याशी आनंदाने संवाद साधला. सदर कार्यक्रमासाठी कोपरगाव पंचायत समितीचे उपसभापती अर्जुनराव काळे यांनी या संवादामध्ये सहभाग घेतला. त्यांनी शाळेतील अडचणी, सुविधा, पालकांचे सहकार्य या विषयीची माहिती दिली.
या प्रसंगी माहेगाव देशमुखचे उपसरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष रविंद्र काळे,उपाध्यक्ष प्रकाश काळे, विक्रांत काळे, पोलीस पाटील नारायण काळे, सुरेश काळे, संतोष लांडगे, शिवाजी लांडगे, मच्छिंद्र जाधव, दादाभाऊ रोकडे, रामभाऊ धोत्रे, सुरेश जाधव, बाळासाहेब पानगव्हाणे, उल्हास काळे,राधाताई चंदनशिव,रंजना रोकडे, पालकवर्ग व ग्रामस्थ यांनी लताताईशी शाळेतील अडचणी, सुविधा, शाळेतील प्रगती, पालक व ग्रामस्थांचे सहकार्य या बाबत चर्चा केली आहे. मुलांना भविष्यात काय बनणार आहे आणि पुढे तुम्ही त्या पदावर गेल्यावर काय करणार व त्या पदासाठी तुम्ही काय प्रयत्न करता ? अशा प्रकारचे प्रश्न विचारून आपण चांगले शिक्षण घेऊन मोठे व्हावे, शिक्षणाने माणसांची प्रगती होते शाळेत वेगवेगळे उपक्रम राबवावेत, शाळेत विज्ञान प्रदर्शन, खेळ, वाचनालय, शैक्षणिक प्रगती करण्याचे आवाहन केले आहे.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष टपाल, संतोष घोडके, श्रीम.वंदना रोकडे, श्रीम.प्रिया माहुरे, संतोष सासवडे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स चे सर्व नियोजन केले.लताताई शिंदे यांचे मार्गदर्शन लाभल्याबद्दल सर्व विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, शिक्षक यांच्या वतीने त्यांचे आभार मानून राष्ट्रगीताच्या सांगतेनंतर व्हिडीओ कॉन्फरन्सचा समारोप झाला आहे.