कोपरगाव तालुका
कोपरगाव शहरातील प्रलंबित विकास कामांना गती द्या-आयुक्त गमेंचे आदेश
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नागरपरिषद राबवित असलेले वसुंधरा अभियानासोबतच नगरपरिषदेने शहरातील विविध प्रलंबित रस्ते,नगरपरिषद इमारतीचे काम,पंतप्रधान आवास योजना आदी कामे वर्तमान वित्तीय वर्ष पूर्ण होण्याच्या आधी प्राधान्याने व वेगाने पुर्ण करा असा आदेश नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नुकताच कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिला आहे.
दरम्यान कोपरगावात आ.आशुतोष काळे,व नगराध्यक्ष विजय वहाडणे हे करत असलेल्या पाच क्रमांकाच्या साठवण तलावाचा मोठा धसका घेऊन जळी,स्थळी,काष्ठी निळवंडे जलवाहिनी पाहणाऱ्या कोल्हे गटाने या ठिकाणी विभागीय आयुक्त यांचा सत्कार केल्यानंतर या ठिकाणी निळवंडे धरणाची पिपाणी वाजवली आहे.मात्र आयुक्त यांना निळवंडे जलवाहिणीचा विषय हा सर्वोच्च पातळीवर प्रलंबित असल्याचे विदित असल्याने त्यांनी,”तलावाची सद्यस्थिती विचारून संगमनेर येथे आठ कोटी लिटरचे नव्याने तयार करण्यात आलेल्या गळती विहीन साठवण तलावाचे कौतुक करून तसा तलाव पूर्ण करा असे सांगून अप्रत्यक्ष त्यांना जोराचा दणका दिला आहे.तर वहाडणे यांनी,”हा तलावही काँक्रिटीकरण होणार असल्याचे सांगून गळती विहिन होणार असल्याचे सांगितले आहे”
कोपरगाव दौऱ्यात आयुक्त गमे यांनी कोपरगाव तहसील कार्यालयास भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला आहे तो प्रसंग.समवेत प्रांताधिकारी गोविंद शिंदे,तहसीलदार विजय बोरुडे आदी मान्यवर.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने “माझी वसुंधरा” हा पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.या उपक्रमातून नागरिकांना वातावरणीय बदल आणि पर्यावरणाच्या समस्यांबद्दल जागरूक केले जात आहे.या अभियानातून राज्याला वातावरणीय बदलाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विविध उपाययोजना हाती घेण्यातही मदत होत आहे.हा विभागाकडून हाती घेतलेला भारतातील पहिला एकात्मिक उपक्रम आहे जो निसर्गाच्या “पंचमहाभूते” नावाच्या पाचही घटकांवर लक्ष केंद्रित करतो.त्यात भूमी,जल,वायू ,अग्नी (ऊर्जा),आकाश यांचा समावेश असून त्यातून राज्याच्या शाश्वत विकासाप्रति प्रयत्न केले जात आहे.यावर केंद्र व राज्य सरकारचे विशेष लक्ष असून त्याचा आढावा आज नाशिकचे विभागागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी कोपरगाव नगरपरिषदेत घेतला आहे.त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी नगर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव लांगोरे,जिल्हा शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील,शिर्डीचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे,तहसीलदार विजय बोरुडे,कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी,भाजप गटनेते रवींद्र पाठक,योगेश बागुल,नगरसेवक मंदार पहाडे,सुनील शिलेदार,नगरसेवक मेहमूद सय्यद,विजय वाजे,स्वप्नील निखाडे,माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,माजी नगरसेवक रमेश गवळी,आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी त्यांनी नगरपरिषदेचा कामाचा आढावा घेताना म्हटलं आहे की,”माझी वसुंधरा अभियान हे शासनाचे महत्वाकांक्षी धोरण असून त्यावर विशेष लक्ष आहे.त्यामुळे शहरात किती वृक्ष लागवड केली.याचा त्यांनी आढावा घेतला आहे.त्यात वृक्ष लागवड,वृक्ष गणना,मनाई येथील घनकचरा विल्हेवाट,वाहतूक,खात प्रकल्प,याचा आढावा घेऊन त्यांनी नगरपरिषदेच्या कारभारावर समाधान व्यक्त केले आहे.व हे सेंद्रिय खत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र ब्रँड विकसित करून त्यास त्यांनी गती देण्याचे निर्देश दिले आहे.
या खेरीज शहरातील वायू उत्सर्जन,त्याचा दर्जा,बाह्य घटक,त्याची तपासणी यांची माहिती घेतली आहे.त्यावेळी मुख्याधिकारी गोसावी यांनी शहरात धूळ अधिक असल्याचे मान्य करून त्यावर उपाय योजना करण्याचे मान्य केले आहे.विशेषतः धारणगाव रस्त्यांमुळे धुळीचे मोठे लोट निर्माण होत आहेत.त्यासाठी रस्त्यांची कामे गतीने करणे गरजेचे असल्याचे मान्य करून गती देण्याचे आश्वासन दिले आहे.या शिवाय नगरपरिषदेच्या नूतन इमारतीच्या कामाचा आढावा घेतला असून ते काम मार्गी लावण्याचे आदेश दिला आहे.
दरम्यान तात्पुरती व जुनी दवाखान्याची इमारत असूनही त्याची देखभाल व निगा,स्वच्छता,रंगरंगोटी यावर त्यांनी समाधान व्यक्त केले असल्याची माहिती गोसावी यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.मात्र नगरपरिषदेत येणाऱ्या नागरिकांना नगरपरिषदेत बसण्याची सोय उपलब्ध करून देण्याचे फर्मान त्यांनी सोडले आहे.शहरातील नागरिकांसाठी वापरण्यात येणाऱ्या घरांची पंतप्रधान आवास योजनेचा आढावा त्यांनी घेतला आहे.त्यावेळी मुख्याधिकारी गोसावी यांनी,शहरात या योजनेला गती देण्यात आलेली असून एक नव्वद घरांचा प्रकल्प पूर्ण झाला असून उर्वरित तीन डी.पी.आर.पूर्ण करण्यास गती देण्यात आली असल्याची माहिती गोसावी यांनी आयुक्तांना दिली आहे.
या शिवाय जलपुनर्भरण या विषयी त्यांनी माहिती घेतली आहे.त्यात कोपरगाव शहरत बेट भागात व खडकी भागात दोन विहिरी पुनर्भरणासाठी वापरण्यात येत असल्याची माहिती दिली आहे.आयुक्तांनी नगरपरिषदेच्या एकूण कारभाराविषयी कौतुक केल्याचेही गोसावी यांनी शेवटी सांगितले आहे.उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आभार मानले आहे.