कोपरगाव तालुका
गोदाकाठ महोत्सवात झाली चाळीस लाखांची उलाढाल !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथे महात्मा गांधी चॅरीटेबल ट्रस्ट (प्रदर्शन)च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गोदाकाठ महोत्सवाला कोपरगाव शहरासह तालुक्यातील नागरिकांनी सलग चार दिवस मोठ्या प्रमाणात गर्दी करून केलेल्या खरेदीमुळे बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या मालाची विक्रमी विक्री होऊन चार दिवसात जवळपास चाळीस लाखांची उलाढाल झाली असल्याची माहिती गोदाकाठ महोत्सवाच्या आयोजक पुष्पाताई काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
गोदाकाठ महोत्सव शुक्रवार दि.३ जानेवारी रोजी सुरु होऊन रविवार दि.५ जानेवारी रोजी संपणार होता परंतु सलग तीन दिवस झालेल्या गर्दीमुळे व नागरिकांच्या आग्रहास्तव हा महोत्सव नियोजित कार्यक्रमापेक्षा एक दिवस अधिक वाढवून सोमवार पर्यंत सुरु ठेवण्यात आला होता.
“चला जाणून घेऊया संस्कृतीच्या पाउलखुणा” हे घोषवाक्य असलेल्या गोदाकाठ महोत्सव शुक्रवार दि.३ जानेवारी रोजी सुरु होऊन रविवार दि.५ जानेवारी रोजी संपणार होता परंतु सलग तीन दिवस झालेल्या गर्दीमुळे व नागरिकांच्या आग्रहास्तव हा महोत्सव नियोजित कार्यक्रमापेक्षा एक दिवस अधिक वाढवून सोमवार पर्यंत सुरु ठेवण्यात आला होता. गोदाकाठ महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी आ.आशुतोष काळे व चैताली काळे यांच्या हस्ते बचत गटांच्या महिलांचा सन्मान करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. त्यावेळी गोदाकाठ महोत्सवात सहभागी झालेल्या बचत गटांच्या महिलांनी महोत्सव काळात झालेल्या व्यवसायाची माहिती दिली. दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी, लहान मुलांसाठी मोफत विविध प्रकारचे खेळाचे साहित्य, युवा वर्गासाठी सेल्फी पॉइंट, संस्कृतीच्या पाऊलखुणांची साक्ष देणारे देखावे व अस्सल मराठमोळ्या जेवणाची चव चाखण्यासाठी नियमितपणे झालेली गर्दी बचत गटांच्या महिलांचा उत्साह वाढविणारी ठरली. खापरावरचे खानदेशी मांडे, सार, शिंपी आमटी, थालीपीठ, मासवडी, वांगे भरीत, मिरचीचा ठेचा, ज्वारीचा हुरडा आणि चुलीवरच्या भाकरीचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. एकावेळी दोन हजार व्यक्ती खाद्यपदार्थाचा आस्वाद घेऊ शकतील एवढी ऐसपैस जागा असून देखील खाऊगल्लीने गर्दीचे विक्रम यावर्षी मोडीत काढले.