कोपरगाव तालुका
सोमवारी आ.आशुतोष काळें यांचा कोपरगावात जनता दरबार
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नागरिकांना सर्वच शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडी-अडचणी जाणून घेवून अडीअडचणीवर उपाय योजना करण्यासाठी सर्व शासकीय कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांसमवेत आ.आशुतोष काळे सोमवार दि.६ जानेवारी रोजी सकाळी १० वा. कोपरगाव तहसील कार्यालयात जनता दरबार आयोजित करण्यात येणार असून जनता दरबारात आपल्या अडी-अडचणी मांडण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
कोपरगाव तालुक्यात भीषण दुष्काळाचा शेतकऱ्यांनी सामना केला असताना व तीन-तीन वर्ष विद्युत पंप सुरु केला नसताना महावितरण कंपनीने त्यांना अव्वाच्या सव्वा बिले देऊन व चोरीचा ठपका ठेऊन लाखो रुपयांची बिले त्यांना देऊन त्यांना लोकन्यायालयाचा धाक दाखवून पठाणी वसुली सुरु केली असल्याने शेतकरी संतप्त झाले असून त्यानां अद्याप न्याय मिळणे अपेक्षित मानले जात आहे.या बैठकीत सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना या बैठकीस निमंत्रित करावे अशी मागणी दुष्काळी शेतकऱ्यांनी आ. काळे यांचेकडे केली आहे.
सर्वसामान्य नागरिक, अपंग व्यक्ती, विधवा महिला, जेष्ठ नागरिक, माजी सैनिक, शेतकरी अशा सर्व स्तरातील सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय कार्यालयात कामानिमित्ताने जावे लागते. शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिक, महिला व जेष्ठ नागरिकांच्या समस्या संबंधित शासकीय अधिकाऱ्यांपुढे मांडून हे प्रश्न निकाली काढण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी जनता दरबाराचे आयोजन केलेले आहे.
विधानसभा सदस्यपदी निवड झाल्यानंतर आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासकामांचा आढावा घेतला होता. त्यावेळी परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या सर्वच शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी अशा सूचना केल्या होत्या. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना मदत मिळालेली आहे. त्याच धर्तीवर महसूल, कृषी, महावितरण, पाटबंधारे, भूमीअभिलेख, एस.टी.महामंडळ, कोपरगाव नगरपरिषद अधिकारी अशा सर्वच शासकीय व निमशासकीय अधिकाऱ्यांसमवेत नागरिकांची बैठक घेऊन नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले असून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांना आपल्या अडी-अडचणी व प्रश्न या जनता दरबारात मांडून ते प्रश्न तात्काळ सोडविण्याची संधी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. सरकारी कार्यालयात कामांसाठी चकरा मारणारे नागरिक आपले गाऱ्हाणे या जनता दरबारात मांडू शकणार आहेत. ज्या सरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांचे प्रश्न प्रलंबित आहेत अशा नागरिकांची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी आ.आशुतोष काळे लक्ष घालणार आहे. या जनता दरबारासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.