कोपरगाव तालुका
सावित्रीच्या लेकींनी कृतीशील बनावे–प्रा.डॉ.शेलार
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आधुनिक क्रांतिकारी, विज्ञानवादी, थोर मानवतावादी, स्त्रीमुक्तीचे जनक महात्मा फुले यांच्या कार्याला पुढे घेऊन जाणारी सावित्री ही असामान्य व्यक्तित्व म्हणून प्रसिद्ध झाल्याचा सार्थ अभिमान महिलांना आहे. म्हणूनच आजच्या युवती स्वत:ला सावित्रीच्या लेकी म्हणून संबोधतात. हे जरी सत्य असले तरी अनेक महिला टी.व्ही.च्या दिशाहीन मालिकांमध्ये, अनिष्ट रूढी परंपरांमध्ये गुंतल्याचे भयानक चित्र दिसत आहे. सामाजिक विकासामध्ये सावित्रीबाई व महात्मा फुले यांनी जे योगदान दिलेले आहे ते अनन्य साधारण असल्याने सावित्रींच्या लेकींनी कृतीशील बनावे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या मराठी विद्यापरीषद सदस्य डॉ.सुधाकर शेलार यांनी कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव शहरात रयत शिक्षण संस्थेच्या श्री सदगुरु गंगागीर महाराज महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८९ वि जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.एस.आर.थोपटे हे होते
सदर प्रसंगी अॅड़.एम.एन. देशमुख महाविद्यालय राजूरचे मराठी विभाग प्रमुख डॉ.द.के.गंधारे,सुशीलाबाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कोळपेवाडीच्या मराठी विभागप्रमुख डॉ.निर्मला कुलकर्णी उपप्राचार्य प्रा.डॉ.रामदास पवार प्रा.रमेश झरेकर, प्रा.डॉ.विजय निकम, प्रा.दिलीप सोनवणे, सर्व विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक-शिक्षेकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
त्यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.थोपटे यांनी सावित्रीबाई फुले व महात्मा फुले त्यांच्या कार्याची महती सांगून विद्यार्थ्यांनी नेहमी त्यांच्या मूल्यांचा आदर्श जपावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.बाबासाहेब शेंडगे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चित्रा करडे व प्रा.प्रकाश सावंत यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प्रा.छाया शिंदे यांनी मानले.