कोपरगाव तालुका
शिरसगावात कांदा लिलाव होणार पूर्ववत सुरु
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाचविण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या शिरसगाव-तीळवणी येथील कांदा लिलाव गुरुवार दि.२ जानेवारी पासून पूर्ववत सुरु होणार असल्याची माहिती कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजीराव रक्ताटे यांनी आमच्या प्रतिनिधीस नुकतीच दिली आहे.
कोपरगाव तालुक्यात सातत्याने दुष्काळ व नाशिक जिल्ह्यातील धरणे कोरडी पडल्याने कांद्याची लागवड कमी झाली होती व म्हणून राज्यासह कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनाही कांदा टंचाईचा फटका बसला होता.कांदाच नसल्याने कांदा बाजारातही आवक रोडावली होती त्यामुळे कांदा बाजार कोपरगाव बाजार समितीलाही बंद ठेवावा लागला होता.मात्र आता नवीन कांद्याची आवक सुरु झाली असून त्याचा लिलाव करणे हि बाब अपरिहार्य बनल्याने कोपरगाव बाजार समितीने आपला कांदा बाजार पूर्ववत सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचे पूर्व भागातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.