कोपरगाव तालुका
रात्रीचे भारनियमन बंद करा-त्रस्त शेतकऱ्यांची महावितरणकडे मागणी
संपादक-नानासाहेब जवरे
कुंभारी (प्रतिनिधि)
कोपरगावसह राज्यात पाऊसमान बरे असले तरी सध्या शेतकऱ्यांना महावितरण कंपनीने रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा सुरु केल्याने शेतकरी त्रस्त झाले असून वाघ,बिबट्या,रानडुकरे आदी जंगली प्राणी व तत्सम संकटामुळे हैराण झाला असून महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना आपला रब्बी हंगाम वाचविण्यासाठी दिवसा विज पुरवठा करावा अशी मागणी कुंभारी ग्रामपंचायतीचे सरपंच दिगंबर बढे यांनी ग्रामस्थांच्या वतीने महावितरण कंपनीचे कोपरगाव येथील उपअभियंता यांचेकडे केली आहे.
यंदा राज्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने विहिरींची भूजल वाढण्याबरोबरच धरणेही काठोकाठ भरल्याने शेतकऱ्यांत उत्साह संचारला आहे. शेतकऱ्यांची रब्बी पिकांची उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे.आता गहू,हरभरा,मका,ज्वारी आदी रब्बी पिके तर भाजीपाला व तत्सम पिकांची उभारणी अंतिम टप्प्यात आली असल्याने या उभारलेल्या पिकांना पाणी भरण्यास प्रारंभ झाला आहे.मात्र त्याच वेळेस राज्य महावितरण कंपनीने आपल्या लीला दाखविण्यास प्रारंभ केला आहे.दिवसा कायमच वीज गायब असते तर रात्री वीज पुरवठा करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्यास महावितरण कंपनीने प्रारंभ केला आहे.सध्या रात्रीच्या वेळी थंडीत मोठी वाढ झाली आहे.त्यातच बिबटे,वाघ व रानडुकरे या रानटी प्राण्यांचा संचार वाढल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे रात्रीच्या वेळी पिकास पाणी भरण्यास जाणे हि खूपच जोखमीची बाब ठरत आहे.या बाबत महावितरण कंपनीस कल्पना देऊनही शेतकऱ्यांचा कैवार कोणीही घेताना दिसत नाही हि दुर्भाग्याची गोष्ट असून महावितरण कंपनीने दिवस भारनियमन करून वीज पुरवठा करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा शेतकरी आंदोलन करतील असा इशाराही सरपंच दिगंबर बढे यांचेसह रवींद्र व्हरे,अनिल घुले,दिनेश साळुंके, संभाजी थोरात,ललित नीलकंठ,किशोर पवार,यांनी ग्रामस्थांच्या वतीने शेवटी दिला आहे.