कोपरगाव तालुका
माजी पोलिस पाटील शंकरराव वरगुडे यांचे निधन
संपादक-नानासाहेब जवरे
संवत्सर (वार्ताहर)
कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील माजी पोलिस पाटील व प्रगतशील शेतकरी शंकरराव वरगुडे यांचे गुरुवार दि. २९ नोव्हेंबर रोजी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. मृत्युसमयी ते ७२ वर्षाचे होते. संवत्सर येथे गोदावरी काठावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पासारली आहे.
कै. शंकरराव वरगुडे यांनी अहमदनगर जिल्हा पोलिस पाटील संघटनेचे माजी अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य संघटनेचे सचिव म्हणून काम पाहिले. पोलिस पाटील संघटनेच्या मागण्यासंदर्भात शासनाकडे वारंवार पाठपुरावा करुन अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. संवत्सर परिसरात ते प्रगतशील शेतकरी म्हणून परिचित होते.
दरवर्षी साईगाथा पारायण सोहळा आयोजित करुन धार्मिक परंपरा त्यांनी आजवर जपली. शैक्षणिक सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्यांनी स्व. नामदेवराव परजणे आण्णा यांच्यासोबत काम केलेले आहे. त्यांच्या पश्चात रविंद्र, प्रविण, अर्जुन ही मुले, दोन मुली, पत्नी, तीन बंधू,नातवंडे असा मोठा परिवार आहे.