कोपरगाव तालुका
कोपरगावात वंचित आघाडीकडून अशोक गायकवाड यांचा प्रचार सुरु
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव विधानसभा मतदार संघातून माजी खा.प्रकाश आंबेडकर यांच्या वंचीत आघाडीकडून संवत्सर येथील कार्यकर्ते अशोक गायकवाड यांची वर्णी लागली असून त्यांनी आपल्या प्रचाराला जोराची सुरुवात केली आहे.त्याना आपल्या प्रचारात मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
वंचित आघाडीकडून त्याना सर्वात आधी उमेदवारी जाहीर होऊनही त्याना पक्षाचा ए. बी. फॉर्म मिळण्यास उशीर झाल्याने व तो पाच ऑक्टोबरच्या छानणी पर्यंतच्या वेळेत न पोहचल्याने त्याना अपक्ष बिरुदावली लागली असली तरी पक्षाचा फॉर्म त्यांना मिळाल्याने ते वंचित आघाडीचे अधिकृत उमेदवार मानले जात आहेत.त्याला वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही शिक्का मोर्तब केलेले आहे.
कोपरगावसह राज्यातील 288 विधानसभा जागांसाठी येत्या 21 ऑक्टोबर रोजी निवडणूक संपन्न होत आहे.कोपरगावात भाजप शिवसेना युतीच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे,राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे आशुतोष काळे,अपक्ष व कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे व प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीकडून अशोक गायकवाड हे आपले नशीब आजमावत आहे.कोपरगाव हा साखर सम्राटांचा तालुका म्हणून ओळखला जातोय.येथे सामान्य माणसाने निवडणूक लढवणे म्हणजे पतंगाने दिव्यावर झेप घेण्याच्या बरोबरीचे मानले जाते.तरीही या सर्व आव्हानांना सामोरे जाऊन संवत्सर येथील माजी सरपंच विजयराव गायकवाड यांचे चिरंजीव व युवा कार्यकर्ते अशोक गायकवाड यांनी दुसऱ्यांदा विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेऊन अनेकांना अचंबित केले आहे.गतवेळी त्यांनी राज्यातील सर्वात प्रभावी गणल्या गेलेल्या राष्ट्रवादीकडून कोपरगाव विधानसभा मतदार संघात आपली उमेदवारी लढवली होती.या लढाईत त्यांना विजय मिळाला नसला तरी त्यांचे नाव कोपरगावच्या राजकीय लढाईच्या इतिहासात कायम कोरले गेले आहे.एका सामान्य कुटुंबात जन्मास येऊनही त्यांची लढाई सर्व आदिवासी ,दलित तरुणांना प्रेरणादायी ठरली आहे.राज्यात वंचित आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले त्या वेळी पहिल्याच यादीत कोपरगावचे अशोक गायकवाड यांचे नाव आल्याने अनेकांना आश्चर्य वाटले होते.त्यांचा पिंड हा सातत्याने सामन्यासाठी संघर्ष करण्याचा असल्याने त्यांच्या उमेद्वारीकडे जनतेने आशेने पाहिल्यास आश्चर्य वाटावयास नको.गावोगावी त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळे त्यांचा उत्साह दुणावला आहे.