कोपरगाव तालुका
वारीत शिवसेना शाखाप्रमुखांनी भागविली गावाची तहान

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पुर्व भागातील सुमारे दहा हजारावर लोकसंख्या असलेल्या वारीगावच्या पाणीपुरवठा योजनेचे काम अनेकदा मंजूर होऊन देखील विविध अडचणी मुळे आजपर्यंत प्रलंबित राहिल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता.गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचे पाणी भर उन्हाळ्यात कमी झाल्याने वारी ग्रामस्थांची चिंता वाढली होती परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेनेचे वारी शाखाप्रमुख मधुकर लक्ष्मण टेके यांनी स्वतःच्या शेतात असलेल्या विहीरीतून स्वयंस्फूर्तीने पुढे येत गावासाठी मुबलक प्रमाणात बिनशर्त,निःशुल्क पाणी उपलब्ध करून देण्याची तयारी असल्याचे सरपंच सतिष कानडे यांना सांगितले आहे.
पाणीपुरवठा पाईपलाईनचे सुमारे १० लक्ष रुपये किंमतीच्या कामात जातीने लक्ष देऊन युद्धपातळीवर काम करून घेतले व एक लक्ष लिटर क्षमतेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत स्वतः उतरून वारीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सतीष कानडे,उपसरपंच विशाल गोर्डे व पाणीपुरवठा विभागाचे मनोज जगधने,विलास जगधने,संदीप आगे यांनी टाकीची आतुन श्रमदान करून स्वच्छता करून घेतली आहे.
त्यांच्या निर्णयाला कुटुंबातील सर्वांची संमती असल्याने पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठा मार्ग सापडल्याने सरपंच सतिश कानडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात तातडीने ग्रामविकास अधिकारी,उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांची बैठक घेऊन टेके पाटील यांच्या विहीरी पासुन पाणी पुरवठा टाकी पर्यंत सुमारे तिन किलोमीटर अंतराची पाईपलाईन कामासाठी तातडीने मंजुरी घेऊन प्रत्यक्ष पाहणी करून अंदाजपत्रक तयार केले आहे.खर्च मोठा असल्याने सोमय्या उद्योग समुहाच्या दि.गोदावरी बायोरिफायनरीज लि.साकरवाडी या कारखाना व्यवस्थापना सोबत ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी तातडीने बैठक घेतली व या कामी सहकार्य करण्याचे आवाहन कारखाना व्यवस्थापनाला केले त्याला सकारात्मक प्रतिसाद देत जी.बी.एल.कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक डी.व्ही. देशमुख,एस.मोहन,बी.पी.पाटील,बी.एम.पालवे यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत सहा लक्ष रुपये देण्याचे आश्वासन त्यांनी दिले उर्वरित सर्व खर्च ग्रामपंचायत वारीच्या वतीने करुन युद्धपातळीवर काम पुर्ण करून गावाला स्वच्छ व मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करुन दिले असल्याने वारी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.सामाजिक कार्यात मदत देण्यात नेहेमीच पुढे असणारे शिवसेना शाखा प्रमुख मधुकर टेके पाटील आणि परिवाराने गावाकरिता दाखविलेल्या दातृत्वाचे व धाडसाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.