कोपरगाव तालुका
कोपरगाव पंचायत समितीच्या फर्निचरसाठी निधी द्या-आ.काळें
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव पंचायत समिती कार्यालयाच्या इमारतीचे विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून या इमारतीच्या फर्निचरसाठी निधी द्यावा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी ग्रामविकासमंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्याकडे नुकतीच केली आहे.
“तालुक्यातील नागरिक विविध कामानिमित्त पंचायत समिती कार्यालयात येत असतात.प्रशासकीय अधिकाऱ्यांना काम करतांना अडचणी येवू नये व नागरिकांची कामे लवकरात लवकर होवून नागरिकांना व कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पंचायत समितीच्या इमारतीमध्ये अद्यावत फर्निचर करणे गरजेचे आहे”-आ.आशुतोष काळे
शासकीय कार्यालयात नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी माजी आ.अशोक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन उपसभापती अर्जुन काळे व प्रशांत वाबळे यांनी आपल्या कार्यकाळात पंचायत समितीच्या इमारतीसाठी निधी मंजूर करून आणला होता.या निधीतून पंचायत समितीच्या इमारतीच्या विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून काही दिवसात काम पूर्ण होवून प्रशासकीय कामासाठी हि इमारत लवकरच नागरिकांच्या सेवेत रुजू होणार आहे.पंचायत समितीच्या इमारतीच्या विस्तारीकरणाचे काम झाल्यामुळे बांधण्यात आलेल्या नूतन सभागृहासाठी व इतर कार्यालयांसाठी फर्निचर करणे आवश्यक आहे. या इमारतींच्या इलेक्ट्रिक कामासाठी निधी मंजूर आहे. मात्र फर्निचरसाठी निधी देण्यात आलेला नाही. याबाबत आ. काळे यांनी बुधवार दि.१७ रोजी मुंबई मंत्रालयात जावून ग्रामविकासमंत्री ना.हसन मुश्रीफ यांची भेट घेवून पंचायत समिती कार्यालयाच्या फर्निचरसाठी निधी मिळावा अशी मागणी केली आहे.
कोपरगाव पंचायत समिती कार्यालायचे विस्तारीकरण काम पूर्ण होत आले आहे.या विस्तारीकरणाच्या कामासाठी जास्तीत जास्त निधी आणून अद्यावत सुविधांनी युक्त पंचायत समिती कार्यालय साकारले जाणार आहे.या विस्तारीकरणाच्या कामासाठी निधी कमी पडणार नाही याची दक्षता घेवून आ. काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून महाविकास आघाडी सरकारच्या ग्रामविकास विभागाने कोपरगाव पंचायत समितीला ७०.०० लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे.विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर या इमारतीमध्ये फर्निचर करावे लागणार आहे.ग्रामीण भागातील नागरिक विविध कामानिमित्त पंचायत समिती कार्यालयात येत असतात.प्रशासकीय अधिकाऱ्यांना काम करतांना अडचणी येवू नये व नागरिकांची कामे लवकरात लवकर होवून नागरिकांना व कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पंचायत समितीच्या इमारतीमध्ये अद्यावत फर्निचर करणे गरजेचे आहे. त्यासाठी पंचायत समितीच्या फर्निचरसाठी जास्तीत जास्त निधी ग्रामविकास खात्याकडून मिळावा अशी मागणी त्यांनी ग्रामविकासमंत्री यांच्याकडे केली आहे. मागील आठवड्यात आ.काळे यांनी तहसील कार्यालयाच्या फर्निचरसाठी महसूल खात्याकडून १९३.४९ लाख रुपये निधी मंजूर करून आणला आहे. व आता पंचायत समितीच्या फर्निचरसाठी निधी मिळावा यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरु केला आहे.तहसील कार्यालय व पंचायत समिती या दोनही कार्यालयात विविध कामानिमित्त नागरिकांची नियमित वर्दळ असते.