कोपरगाव तालुका
कोपरगावातील पाणी योजनांची कामे तातडीने पूर्ण करा-आवाहन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
उन्हाळा सुरु होत असून भविष्यात नागरिकांना संभाव्य पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही याची काळजी घेवून ग्रामपंचायत पदाधिकारी व पंचायत प्रशासनाने संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करावी अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी नुकत्याच एका बैठकीत दिल्या आहे.
“उन्हाळा आता तीव्रपणे सुरु होत आहे.त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाई समस्या उदभवणार नाही यासाठी वेळेत उपाय योजना करणे गरजेचे आहे.त्यासाठी पंचायत समिती प्रशासनाने सतर्क राहावे नागरिकांच्या तक्रारी येऊ देऊ नये”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव विधानसभा मतदार संघ.
कोपरगाव पंचायत समितीच्या सर्व विभागाची वार्षिक आढावा बैठक नुकतीच आ.काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली त्या वेळी ते बोलत होते.
यावेळी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापतीअर्जुनराव काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,जिल्हा परिषद सदस्या सोनाली रोहमारे,पंचायत समिती सदस्य श्रावण आसणे,अनिल कदम,जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,उपगटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे,उपअभियंता उत्तम पवार,कृषी अधिकारी पंडित वाघिरे,सर्व गावांचे ग्रामविकास अधिकारी आदी उपस्थित होते.
त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”उन्हाळा सुरु होत आहे.पाणी टंचाई समस्या उदभवणार नाही यासाठी वेळेत उपाय योजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी पंचायत समिती प्रशासनाने सतर्क राहावे.सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.मागील वर्षी कोरोनाचे रुग्ण वाढत असतांना ग्रामीण भागात ज्या उपाय योजना केल्या त्या उपाययोजना आवश्यक त्या ठिकाणी राबवा.१४ व्या वित्त आयोगातील शिल्लक राहिलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करा.१५ व्या वित्त आयोगाच्या मिळणाऱ्या निधीतून नागरिकांना अपेक्षित असलेली व नागरिकांच्या गरजेची कामे ओळखून कामे प्रस्तावित करा.१५ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करतांना काळजी घेवून कामाची गुणवत्ता चांगली राहील याची काळजी घ्यावी.जनतेचे सेवक या नात्याने ती आपली जबाबदारी असून त्यातूनच खऱ्या अर्थाने लोकहित साधले जाणार असल्याचे आ. काळे यांनी शेवटी सांगितले आहे.