कोपरगाव तालुका
शिरसगाव येथील उपबाजारच अवैध-बाजार समितीच्या संचालकांचा दावा !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागात गतवर्षी बाजार समितीने सुरु केलेल्या शिरसगाव उपबाजाराला सहकारी जिल्हा उपनिबंधकांनी अद्याप परवानगीच दिली नसल्याचा गौप्यस्फोट बाजार समितीचे संचालक सुधाकर फकिरा गाढवे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केला आहे.त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव बाजार समितीने राहाता तालुका स्वतंत्र झाल्यापासून व त्यांची बाजार समिती सुरु झाल्यापासून या बाजार समितीवर आर्थिक दृष्ट्या प्रतिकूल परिणाम झाला कोपरगाव बाजार समिती सावरण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कोणतेही प्रयत्न केले नाही. उशिराने शहाणपण येऊन दोन वर्षांपूर्वी चासनळी, जवळके,शिरसगाव,सुरेंगाव आदी ठिकाणी तालुक्यात उपबाजार चालू करण्याचा निर्णय एका ठरावानुसार केला होता.तथापि अनेक ठिकाणी जागाच उपलब्ध नसल्याने हा प्रश्न तसाच रेंगाळत पडला असताना गत वर्षी शिरसगाव येथे कांदा बाजारांसह उपबाजार सुरु करण्यात आला व त्याला जिल्हा उपनिबंधकांनी परवानगी दिली असल्याचे भासवले गेले मात्र ही बाब नुकत्याच झालेल्या लेखापरिक्षणात उघडी झाली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.त्यामुळे सगळा भंडाफोड झाला आहे.
त्यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे की,कोपरगाव बाजार समितीकडे वारंवार मौजे जवळके येथे उपबाजार सुरू व्हावा म्हणुन संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये वेळोवेळी तोंडी व लेखी मागणी केलेली आहे.परंतु आपल्या भागातील सत्ताधारी संचालक यांनी मला कधीच पाठिंबा दिला नसुन जवळके भागात उपबाजार सुरू होणेसाठी त्यांनी कधीच आग्रह धरला नाही असा आरोप केला आहे. जवळके ग्रामपंचायतने सदर उपबाजार सुरू करण्यासाठी त्यांच्या मालकीची पाच एकर जागा देण्याचा ग्रामसभेचा ठराव २०११ मध्ये करून सदर जागा बाजार समितीला देण्याबाबत निश्चित केलेले होते.मात्र त्याकडे पाच ते सहा वर्षे डोळेझाक करण्यात आली.
कोपरगाव बाजार समितीकडे वारंवार मौजे जवळके येथे उपबाजार सुरू व्हावा म्हणुन संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये वेळोवेळी तोंडी व लेखी मागणी केलेली आहे.परंतु आपल्या भागातील सत्ताधारी संचालक यांनी सातत्याने टाळाटाळ केली आहे -सुधाकर गाढवे
कोपरगाव बाजार समितीची मालमत्ता व उत्पन्न वाढत असताना त्याला विरोध करणारे झारीतील शुक्राचार्य नेमके कोण होते हे हि या निमित्ताने उघड होणे गरजेचे आहे .जवळके येथे जर उपबाजार सुरू झाला असता तर अनेक व्यापारी या भागात तयार होऊन या भागातील तरुणांना रोजगार मिळाला असता.तसेच या भागातील शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या वेळेत बचत होऊ झाली असती.
दुष्काळी भागातील सामाजिक कार्यकर्त्यानी काकडी येथील शेतकऱ्यांत जनजागृती घडवून दुष्काळी भागात विमानतळ आणले असून जवळके येथे जर उपबाजार सुरु झाला असता तर कार्गो विमानतळाला येथील गोदामे उपयुक्त ठरली असती.
व या भागातील शेतकऱ्यांचा माल निर्यात होऊ शकला असता.परंतु राजकीय द्वेषापोटी हेतुपुरस्कर या ठिकाणी उपबाजार सुरू करण्याचे टाळले जात आहे.व जवळके येथे उपबाजार सुरू न करता शिरसगाव या ठिकाणी कोठारी नामक व्यापाऱ्यांच्या मालकीची दोन एकर जागा खरेदी करून त्या ठिकाणी उपबाजार सुरू करण्याचा इरादा आहे . सदर जमिनीची दोन एकराचे मूल्य चोवीस लाख अकरा हजार रुपये इतके विक्रमी ठरवले आहे . सदरचे जमीन मालक कोठारी हे बाजार समितीचे भुसार मालाचे व्यापारी असल्याचे वृत्त हाती आले आहे.सदर जमिनीची लवकरच खरेदी करून शिरसगाव येथील उपबाजाराच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविणार असुन त्या ठिकाणी पेट्रोल पंप सुरू करण्याचे धोरण आहे.