कोपरगाव तालुका
अधिकाऱ्यांची मुजोरी खपवून घेतली जाणार नाही – उपसभापती काळे
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव(प्रतिनिधी)
आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत व यापुढेही विकासकामांचा ओघ असाच सुरु राहावा यासाठी पंचायत समितीच्या होणाऱ्या बैठकीत विकासकामांचे नियोजन केले जात आहे. मात्र शुक्रवार (दि.२२) रोजी पार पडलेल्या सर्व साधारण सभेसाठी काही विभागाचे विभाग प्रमुख गैरहजर असल्याचे निदर्शनास येताच उपसभापती अर्जुन काळे यांनी कडक भूमिका घेतांना यापुढे मासिक सभेला काही विभाग प्रमुख व अधिकाऱ्यांनी गैरहजर राहून केलेली मुजोरी खपवून घेतली जाणर नाही अशी तंबी या बैठकीसाठी गैरहजर राहणाऱ्या शासकीय विभागाच्या विभाग प्रमुखांना व अधिकाऱ्यांना दिली आहे.
“भविष्यात अधिकाऱ्यांनी प्रशासकीय कामात वेळकाढू पणा केल्यास विभाग प्रमुखांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी आ.आशुतोष काळे यांच्यामार्फत पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे तक्रार करणार”-उपसभापती अर्जुन काळे
कोपरगाव पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा शुक्रवार (दि.२२) रोजी सभापती सौ.पोर्णिमा जगधने यांच्या अध्य्यक्षतेखाली पार पडली. तालुक्यातील विविध शासकीय यंत्रणांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सर्वसाधारण सभेला काही विभागाच्या विभाग प्रमुखांनी दांडी मारून आपली निष्क्रियता दाखवून दिली. या मासिक सभेला कोपरगाव पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील राज्य शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या महाराष्ट्र राज्य वीजमंडळ, एस.टी.महामंडळ, लागवड अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, तालुका लघूचिकित्सालय, कृषीविभाग, महाराष्ट्र जीवनप्राधिकरण, कुक्कुट प्रकल्प, ड्रेनेज विभाग, ग्रामीण रुग्णालय आदी शासकीय यंत्रणांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी घेतलेल्या सर्वसाधारण सभेला तहसील, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, ड्रेनेज आदी विभागाचे जबाबदार विभाग प्रमुख व संबंधित अधिकरी गैरहजर होते. तालुक्याच्या विविध शासकीय यंत्रणांना प्रशासकीय कामात येत असलेल्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यातून योग्य मार्ग काढण्यासाठी व भविष्यातील करावयाच्या उपाप योजना याबाबत विचारविनिमय करण्यासाठी प्राधान्याने मासिक सभेचे आयोजन केले जाते. या सभेला सर्व शासकीय यंत्रणांच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे अनिवार्य असले तरी काही अधिकाऱ्यांनी जाणून बुजून या सभेकडे पाठ फिरवली. गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी अल्पावधीतच आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवितांना घरकुल योजना, पशुसंवर्धन योजनेंतर्गत येणारे गायगोठे, आरोग्य विभाग, प्रधानमंत्री, रमाई, शबरी आवास योजना आदी शासकीय योजना अत्यंत प्रभावीपणे राबविल्या आहे मात्र त्यांना इतर शासकीय यंत्रणांकडून सहकार्य मिळत नसल्याचे चित्र या मासिक सभेत दिसून आले आहे.
यावेळी गटविकास अधिकारी सचीन सूर्यवंशी, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, अनिल कदम, श्रावण आसने, सौ.वर्षा दाणे, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, तालुका आरोग्य अधिकारी सौ.वैशाली बडदे, उपअभियंता उत्तमराव पवार, पशुसंवर्धनचे डॉ.दिलीप दहे, महिला बालकल्याणचे पंडित वाघिरे, वनविभाग पूजा रक्ताटे, शिक्षणाधिकारी पोपट काळे, सर्व विभागाचे विस्तार अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.