कोपरगाव तालुका
कोपरगावात रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,राष्ट्रीय सेवा योजना व कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सुशीलामाई काळे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादाप्रमाणे या वर्षी संजीवनी रक्तपेढी कोपरगाव यांच्या सहकार्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या उपाय योजना करून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
देशात रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते.अनेक मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होते.तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते.या देशात १३० कोटी लोकसंख्या असूनही केवळ ७४ लाख ते १ कोटी २० लाख लिटर रक्त संकलित होते-डॉ.नीता पाटील.
या रक्तदान शिबिराचे उदघाटन संस्थेचे विश्वस्त सिकंदर चांद पटेल यांच्या हस्ते संपन्न झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सौ.विजया गुरसळ होत्या.
याप्रसंगी विश्वस्त सिकंदर चांद पटेल म्हणाले की,रक्तदानामुळे गरजू रुग्णांना जीवदान मिळत असून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे त्यासाठी रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात सहभागी होवून रक्तदान करणे आपली सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी बोलतांना महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख तथा प्राध्यापिका डॉ.निर्मला कुलकर्णी यांनी स्व.सुशीलामाई काळे यांच्या स्मृतीला उजाळा देतांना माईंचे अष्टपैलू व्यक्तिमत्व उलगडून दाखवत कर्मयोगिनी माईंच्या आदर्श विचारांचे अनुकरण करणे काळाची गरज असल्याचे आपल्या मनोगतात सांगितले.
यावेळी संजीवनी रक्तपेढीच्या संचालिका डॉ.नीता पाटील यांनी कोरोना संकटामुळे रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेवर रक्त मिळत नसून अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यास विलंब होत आहे.त्यामुळे अशा पुण्यवान व्यक्तीच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित केलेले रक्तदान शिबीर पुण्याचे कार्य असल्याचे त्यांनी सांगितले.आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ.विजया गुरसळ म्हणाल्या की,”माईंचा दातृत्वाचा गुण अंगिकारला पाहिजे.आज रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असल्यामुळे त्यांच्या स्मृतिदिनी रक्तदान करणे हि त्यांच्यासाठी आदरांजली ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या रक्तदान शिबिरात एकूण ३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा.से.यो.अधिकारी प्राध्यापक संतोष जाधव यांनी केले.सूत्रसंचलन प्रा.उमाकांत कदम व प्रा.विशाल पोटे यांनी केले आहे.