कोपरगाव तालुका
टाकळी फाट्या नजीक दुचाकीला ठोकरले,एक ठार,गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराच्या उत्तरेस साधारण तीन कि. मी.अंतरावर असलेल्या टाकळी फाट्या नजीक टाकळी कडून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर टेम्पो (क्रं. एम.एच.१५ ई. जी.९९९२) याने समोरून येणाऱ्या दुचाकीस (क्रं. एम.एच.-१७ बी.डब्लू.९६५१)हिच्यावरील चालकास समोरासमोर जोराची धडक दिल्याने या दुर्घटनेत देविदास सुखदेव पवार (वय-५० वर्ष)हा इसम जागीच ठार झाला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव तालुक्यातील नगर-मनमाड ते टाकळी फाटा या दरम्यान टाकळी फाट्यानजीक टाकळीकडून येत असलेल्या वरील क्रमांकाच्या आयशर टेम्पोने समोरून येणाऱ्या दुचाकी स्वारास दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास जोराची धडक दिली.त्यात दुचाकीस्वार देविदास पवार हे गंभीर जखमी झाले त्यांना नजीकच्या ग्रामस्थानी धाव घेऊन नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी भरती केले असता उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या अपघातानंतर आयशर चालक आपल्या ताब्यातील वाहनासह निघून गेला असल्याची फिर्याद मयताची पत्नी मनीषा देविदास पवार रा.चाळीस खोल्या येसगाव यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आयशर चालक जावेद अजगर सय्यद यांचे विरुद्ध गु.र.नं.२८३/२०१९ भा.द.वि.कलम.३०४(अ),२७९,३३७,३३८,४२७,मो.वा. का.कलम १८४,१३४,(अ),(ब),१७७ प्रमाणे आयशर चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. डी. आर.तिकोणे हे करीत आहेत.दरम्यान दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.