जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

शेतीच्या आवर्तनाबरोबरच पाण्याचे उद्भव भरुन द्यावेत- परजणेंची मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव(प्रतिनिधी) कोपरगांव व राहाता तालुक्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी असल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे. गोदावरी डाव्या व उजव्या कालव्याद्वारे शेतीसाठी सोडण्यात आलेल्या आवर्तनाबरोबरच पिण्याच्या पाण्याचे उद्भव पाटबंधारे विभागाने तातडीने भरुन द्यावेत अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या एका निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे.

कोपरगांव व राहाता तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. जमिनीत पाणी जिरले नसल्याने विहिरी, कुपनलिकांची पाण्याची पातळी खोलवर गेलेली आहे. काही ठिकाणच्या विहिरी तर अक्षरश: कोरड्या पडल्या आहेत. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भेडसावू लागली आहे. अनेक गावांना ऐन पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. पाण्यासाठी महिलांची कोसोदूर भटकंती सुरु आहे. माणसांबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची टंचाई जाणवू लागली आहे. शेतीला पूरक म्हणून ओळखला जाणारा दुग्ध व्यवसाय अडचणीत सापडला आहे. दैनंदिन दूध संकलन कमी होत चालले आहे. शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

गोदावरी डाव्या व उजव्या कालव्याद्वारे शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आलेले असून गोदावरी नदीमधूनही मराठवाड्याकडे पाण्याचा विसर्ग अजून सुरुच आहे. परंतु आता जायकवाडी धरण देखील पूर्ण क्षमतेने भरल्याने खाली पाणी सोडण्याची आवश्यकता वाटत नाही. तेच पाणी डाव्या आणि उजव्या कालव्याद्वारे सोडून कोपरगाव व राहाता तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे गांवतळे, बंधारे, शेततळे आदी उद्भव तातडीने भरुन देणे गरजेचे आहे.

यामुळे पिण्याच्या पाण्याची अडचण दूर होण्यास नक्कीच मदत होईल शिवाय टँकरद्वारे करण्यात येत असलेला पाणी पुरवठा बंद होऊन त्यासाठी होणारा शासनाचा खर्चही वाचेल. पिण्याच्या पाण्याची ही गंभिर परिस्थिती विचारात घेवून शेतीच्या आवर्तनाबरोबरच गावोगांवचे पिण्याच्या पाण्याचे उद्भव तातडीने भरुन देण्याबाबत पाटबंधारे विभागास आपले निर्देश व्हावेत अशी मागणीही राजेश परजणे यांनी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून या पत्राच्या प्रती गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनाही पाठविण्यात आलेल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close