जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

विकास कामांचा ठराव रोखला,कोपरगावात आंदोलन सुरू !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव नगरपरिषदेच्या काल सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान संपन्न झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी भाजपच्या कोल्हे गटाने पुन्हा एकदा आपला नकारात्मक दृष्टिकोन दाखवून देऊन विकास कामांना विकास कामांना खो घातल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादीने आज सकाळ पासून शिवसेना व काँग्रेसला सोबत घेत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरू केल्याने कोपरगावात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद निवडणुकीचा शिमगा सुरु झाल्याचे मानले जात आहे.

“राष्ट्रवादीने शहर विकासासाठी सुरू केलेले आंदोलन योग्य असून आपल्याला बरेच काही बोलायचे आहे मात्र आपण आत्ताच बोलणे उचित समजत नाही योग्य वेळ आली की त्याबाबत नक्कीच मतप्रदर्शन करु”-विजय वहाडणे,नगराध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.

कोपरगाव नगरपरिषदेच्या स्थायी समितीची बैठक दि.१२ जानेवारी रोजी नगरपालिका सभागृहात संपन्न झाली असून या बैठकीत नगराध्यक्ष विजय वहाडणे,सत्ताधारी गटाचे उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे,गटनेते रवींद्र पाठक,आरोग्य सभापती अनिल आव्हाड व त्यांचे अन्य सहकारी पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.या बैठकीत भाजपच्या कोल्हे गटाने आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे श्रेय वहाडणे गटास मिळू नये यासाठी हि पाचर मारल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे स्थायी समितीचे सदस्य मंदार पहाडे यांनी कालच टीकास्त्र सोडले होते व आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास या घटनेच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केल्याने शहरातील राजकीय वातावरण ऐन थंडीत गरमागरम झाले आहे.कोपरगाव नगरपरिषदेने कोरोनाच्या प्रतिकूल कालखंडात शासन निर्देशानुसार दि.१५ सप्टेंबर रोजी ऑनलाईन सभा घेतली होती त्यावेळीच विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर होणार हा रागरंग पाहून भाजपचे सर्व पदाधिकारी व सर्व नगरसेवक अस्वस्थ झाल्याचे पाहायला मिळाले होते. व त्यावेळी ईशान्य गडावरील युवराजाच्या आदेशाने सर्वांनी आपल्याला ऐकूच येत नसल्याचा बनाव केला होता.त्या नंतर दुसरी उपनगराध्यक्ष निवडीची सभा प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली ती मात्र सर्वांना सविस्तर व विना अडथळा ऐकू आल्याचे आक्रीत उघड झाले होते.या बैठकीनंतर मात्र या युवा नेत्याने या सर्व नगरसेवकांची आपल्या गडावर एक गोपनीय बैठक घेऊन त्यांचे कान उपटले असल्याची माहिती प्राप्त झाली होती.व संतप्त होऊन ,”तुम्ही वीस नगरसेवक असूनही ठराव मंजूर होतातच कसे ? व एकटे नगराध्यक्ष विजय वहाडणे तुम्हाला भारी भरतात कसे ? असा तिखट सवाल व जाबसाल केला होता.त्यावेळीच आगामी काळात हा शिमगा उत्तरोत्तर रंगत जाणार हे उघड झाले होते.या शिवाय आगामी नोव्हेंबर महिन्यात कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक येऊन ठेपली असल्याने ही दीड डझन कामे शहरात उभी राहिली तर आ.आशुतोष काळे,नगराध्यक्ष विजय वहाडणे व त्यांच्या सहकारी राष्ट्रवादीची हवा होईल ही साधार भीती भाजपच्या पोटात निर्माण झाली असल्याने हे होणार होते फक्त कधी एवढाच प्रश्न शिल्लक होता.तो आता स्पष्ट झाल्याने आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट झाल्याचे मानले जात आहे.त्या मुळे आगामी काळात पाच क्रमांकाचा साठवण तलाव व गाव अंतर्गत रस्ते,तत्सम विकास कामे,साठवण तलावातील पाणी चोरी हे विषय ऐरणीवर येणार हे उघड आहे.निळवंडेची बंदिस्त जलवाहिनी व साई संस्थानच्या तिजोरीवरील हजार कोटीवरील डल्ला हा विषय गत वर्षी संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनीच तत्कालीन लोकप्रतिनिधीला आरसा पाहाण्यास भाग पाडल्याने आता तो विषय कालबाह्य झाला असल्याचे मानले जात आहे.शिवाय ते पाणी लिफ्टिंग असल्याने वीज बिलाचा वर्षाला तीन कोटींचा खर्च (साई संस्थान करणार की नाही अद्याप हे स्पष्ट झालेले नाही व तसे करारही अद्याप झालेले नव्हते) न झेपणारा व पालिकेच्या आर्थिक कुवतीबाहेरचा असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी उघड केले आहे.पालिकेची आधीच नांदूर माध्यमेश्वर कालव्याद्वारे प्रवाही सिंचनाने पाणी मिळूनही सहा कोटींची पाणी पट्टीची थकबाकी आहे.बंदिस्त जलवाहिनी हा आतबट्याचा व्यवहार होतो यावर निळवंडे कालवा कृती समितीच्या वतीने दाखल केलेल्या जनहित याचिकेत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात अनेक वेळा चर्वितचर्वण झालेले आहे.शिवाय पिण्याच्या नावाने गोदावरी कालव्यांना येणारे पिण्याचे आवर्तन व त्यामुळे कालव्या लगतच्या शेतकऱ्यांची पाण्याची वाढणारी भूजल पातळी कायमची बंद होणार असल्याने याबाबत कालव्याचे लगतच्या शेतकऱ्यांची नाराजी सत्ताधारी व विरोधकांना न परवडणारी आहे.या बाबत माजी मंत्री असलेल्या काळे व कोल्हेनी कधीही हा विषय याच कारणाने छेडला नव्हता हे आजच्या अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणाऱ्या लोकप्रतिनिधींना कोणी तरी सांगण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.मात्र असे प्रश्न निवडणुका डोक्यासमोर ठेऊन सत्ताधारी व विरोधक निर्माण करत असल्याने ही केवळ मतांची बेगमी ठरत असल्याचे तालुक्याने व शहराने अनेक वेळा अनुभवले आहे.त्यामुळे अशा प्रश्नाकडे नागरिकांनी डोळेझाक करणे व आपल्या हिताचे काय आहे हे ठरवणे हा पर्याय उत्तम ठरतो.आता हा प्रश्न एवढ्याने मिटतो की,अन्य उग्र रूप धारण करतो हे पाहण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.मात्र या प्रश्नावरून कोपरगावात आगामी काळात शिमगा रंगणार आहे हे सांगण्यास कोणा ज्योतिषाची गरज नाही.

दरम्यान या बाबत आमच्या प्रतिनिधीने आंदोलनकर्ते राष्ट्रवादीचे गटनेते विरेंन बोरावके यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”कोपरगाव नगरपरिषदेच्या हद्दीतील विकास व आरोग्य विषयक कामे मंजूर झाले असते तर त्याचे स्रेय आ.आशुतोष काळे व नगराध्यक्ष विजय वहाडणे व राष्ट्रवादीचे नगरसेवक यांना गेले असते त्यामुळे हा खोडा घातला असल्याचा” आरोप केला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close