कोपरगाव तालुका
कोपरगावात लाचेच्या सापळ्यातुन आणखी एक तलाठी बचावला !
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यात एक कारागृह लिपिक व दोन तलाठी लाच-लुचपत विभागाने लाच घेताना जाळ्यात पकडले असताना जवळके परिसरात कार्यरत असलेला आणखी एक तलाठी लाच घेताना थोडक्यात बचावला असल्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध झाल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.व याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
लाचखोरीमध्ये महसूल विभाग दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रथम स्थान कायम आहे.महसूल विभागातील भ्रष्टाचाराची २०१ प्रकरणे उघडकीस आली असून २५३ जणांना अटक करण्यात आली आहे.सरकारच्या अनेक योजना असून या योजनांचे फायदे मिळवून देण्यासाठी लोकसेवकांकडून लाच घेतली जाते.यात सर्वाधिक ४९ प्रकरणे या वर्षात आतापर्यंत समोर आली आहे.भ्रष्टाचारमुक्तीसाठी लाचलुचपत विभाग तसेच सरकारी यंत्रणातर्फे वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती केली जाते.यामुळे लोक लाच देत नाहीत आणि कोणी लाच मागितली तर त्या विरोधात तक्रार करण्यासाठी पुढे येतात.त्यातच सामाजिक संकेतस्थळ तसेच अनेक माध्यमाद्वारे पकडले जाण्याची भीती असल्याने लोकसेवक लाच मागताना अनेकदा विचार करतात.त्यात कारवाईची भीती असल्याने सापळ्यांमध्ये घसरण होत असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले असले तरी नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका मात्र याबाबत आघाडीवर असल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे.गत काही महिन्यात हि आकडेवारी दिवसागणिक वाढत चालली आहे.एकीकडे महसूल विभागाचे अधिकारी विविध पुरस्कार मिळवत असताना त्यांच्या हाताखालील कर्मचारी मात्र कुठलीही कसर सोडताना दिसत नाही हे मोठे आक्रीत मानले जात आहे.कोपरगाव तालुक्यात कुंभारी येथील साबणे व येसगाव येथील एक कवळे नावाची महिला महसूल कर्मचारी आदी ठिकाणचे तलाठी लाच घेताना नुकतेच पकडले गेले होते.त्या पासून कोणताही बोध कोपरगाव तहसील कार्यालयाने घेतलेला दिसत नाही.याकडे राजकीय नेते सोयीस्कर दुर्लक्ष करताना दिसतात.तहसील कार्यालयातील उपकारागृह अधीक्षक रवींद्र देशमुख हे लाच घेताना अटक झाले होते.त्या नंतर तरी काही फरक पडेल अशी सामान्य नागरिकांची अपेक्षा होती मात्र ती नुकतीच फोल ठरल्याचे निष्पन्न झाले आहे.कोपरगाव तालुक्यातील जवळके परिसर हा मध्यवर्ती समजला जातो.या ठिकाणच्या सजेशी अनेक गावे जोडलेली आहे.त्याचा फायदा येथील प्रत्येक तलाठी उठवत असतो.तेथे असलेल्या झिरो तलाठ्याचा प्रश्न तर अनेक तहसीलदार आले अन गेले पण कोणालाही सोडवता आलेला नाही.येथील ग्रामस्थ,शेतकरी या महसूल विभागाच्या लुटीला वैतागले गेले आहे.अनेकांनी या बाबत लेखी तक्रारी केल्या आहेत.फार तर त्या गावातील झिरो तलाठ्याला हटविल्याचे नाटक चांगले वठवले जाते मात्र अन्य गावातील दप्तर हे महाशय कधीही आपल्या बगलेत घेऊन हिंडताना दिसतात.एवढेच नाही तर तलाठी आणि परिसराचे दप्तर हे त्यांच्या पिशवीतच असते.खाते फोडणे,विहीर नोंदी करणे,नवीन खरेदी नोंदी करणे,जुने फेरफार काढणे,इतर हक्काच्या नोंदी करणे आदी कामे हि तलाठी टाळाटाळ करताना दर्शवतात मात्र हे झिरो तलाठी काही क्षणात करतात दिसतात.त्याच्याकडे तलाठ्यांच्या सह्या अगोदरच असतात.याचा अनुभव सार्वत्रिक आहे.यातून तेथील हे तलाठी व त्यांचे हस्तक हे ग्रामपंचायत पदाधिकारी व तत्सम लोकसेवकांना ढाब्यांवर ओल्या पार्ट्या साग्रसंगीत देताना दिसतात.अशीच घटना नुकतीच बुधवारी घडल्याचे निष्पन्न झाले असून त्या परिसरातील एका ग्रामपंचायत सदस्यांचे सरकारी सेवेत असलेल्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांनी वारस नोंदी,हक्कसोड पत्रक,व खरेदीची नोंद आदीकरिता अर्ज केला त्यासाठी तहसील कार्यालयातून रीतसर परवानगीही मिळवली त्याची नोंद करण्यासाठी त्या परिसरातील तलाठ्याकडे अर्ज सादर केला.व ती नोंद आज होईल उद्या होईल या आशेवर अनेक दिवस वाट पाहिली मात्र तलाठी महाशयांनी त्याची साधी दखलही घेतली नाही.खोलात चौकशी केली असता या तलाठी महाशयांना हात ओले करण्याची अपॆक्षा लागली होती.मात्र या युवा सदस्याला मात्र लाच देण्याची अपेक्षा नव्हती. त्याने या बाबत गावच्या लोकप्रतिनिधीकडे तक्रार करून पाहिली मात्र परिणाम उलटाच झाला हे महाशयही त्या तालाठ्याला सामील असल्याने त्यानेही सहा हजारांचा मलिदा देण्याचा सल्ला दिला.त्या मुळे वैतागून गरजू व्यक्तीने त्या तलाठ्याला काही रक्कम दिलीही मात्र तलाठ्याची लाच खाण्याची भूक काही थांबली नाही.त्यामुळे अखेर हे सदस्य वैतागून गेले व त्यांनी अखेर लाच लुचपत विभागाशी संपर्क साधून या तलाठ्याला सापळ्यात अडकविण्याचा निर्णय घेतला व तसा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता.लाच-लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसा सापळाही बुधवार दि.०२ डिसेंम्बर रोजी दुपारी ०३ वाजेच्या दरम्यान लावला होता.सापळा लावला असताना दीड हजारांची लाच घेताना रेकॉर्डिंगही झाले होते.मात्र उर्वरित रक्कम देताना नेमका या सापळ्याची खबर एका अज्ञात इसमाने या तलाठ्याला भ्रमणध्वनिवरून दिली आणि तेथेच पचका झाला.ती रक्कम तेथेच टेबलवर टाकून या तलाठ्याला पळावे लागले आहे.या गडबडीत महाशयांनी आपला लॅपटॉप तसाच टाकून ऑफिस उघडे टाकून गावाच्या पूर्वेला असलेल्या गाडीवाटाने आपली दुचाकी घेऊन एका कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाटेने धूम ठोकली व पसार झाल्याने लाचलुचपत विभागाला हात चोळीत परत जावे लागले आहे.याची उलटसुलट चर्चा चविष्टपणे जवळके परिसरात चौका-चौकात सुरु आहे.त्या ठिकाणी बहादराबादचे एक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.त्या नंतर लाचलुचपत विभागाचे अधिकारी गेल्याची खात्री झाल्यावर त्या तलाठ्याने तेथील कनिष्ठ कर्मचाऱ्यास फोनवरून सगळा मामला नीट समजावून सांगितला व कार्यालय बंद करण्यास सांगितले व चावी घेण्यास शहापूर फाट्यावर कमानिजवळ हजर राहिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.याबाबत कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांचेशी भ्रमनध्वनिवरून संपर्क साधला असता त्यानी त्याला प्रतिसाद दिला नाही.तर तलाठी यांनी आपला भ्रमणध्वनी बंद करून ठेवला असल्याचे आढळले आहे.याशिवाय या महाशयांनी अद्याप आपल्या कार्यालयास दांडी मारलेली आढळून आली आहे.त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे.