कोपरगाव तालुका
कोपरगावातील शहरातील नागरिकांना पालिका बनली देवदूत!
पत्रकार नानासाहेब जवरे
कोपरगाव(प्रतिनिधी)कोपरगाव शहरात २००६ नंतर तेरा वर्षांनी आलेल्या पुरात कोपरगाव नगरपरिषदेने १३२५ नागरिकांना सतर्क करत त्यांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या खाण्यापिण्यासह व्यवस्था करून त्यांचा जीव वाचविण्यात अहम भूमिका निभावल्याने नागरिकांनी नगराध्यक्ष विजय वाहाडणे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या नियत उपक्रमाबद्दल (वेळेत केल्याने) समाधान व्यक्त केले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहराच्या दक्षिण बाजूकडून गोदा-गौतमी हि प्राचीन नदी वाहते.गावठाण जरी उंचावर असले तरी कोपरगावचा विस्तार वाढत जाऊन शहर बऱ्याच अंशी फुगले आहे.आज एक लाखाहून अधिकची लोकसंख्या शहरात अधिवास करत असून गोदावरीस चार ऑगष्ट रोजी जलसंपदा विभागाने २९ जुलै रोजी प्रथमतः मोठ्या प्रमाणावर नाशिक जिल्ह्यात पर्जन्य कोसळल्याने नदीपात्रात मोठा विसर्ग सोडला होता.त्या नंतर सातत्याने तो वाढत जाऊन तो ३ ऑगष्ट रोजी दोंन लाख ९६ हजार क्युसेसवर या विक्रमी पातळीवर पोहचला होता.त्यामुळे कोपरगाव नगरपरिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन समितीवर मोठी जबाबदारी वाढली होती त्यासाठी नगराध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी हि जबाबदारी पेलण्यासाठी कंबर कसली.व आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना या कामात जुंपून घेण्याचे फर्मान काढले .त्यातून ११६ आरोग्य विभागाचे कर्मचारी,ठेकेदारांचे १०८ कर्मचारी,बांधकाम विभागाचे ठेकेदार यांचे चाळीस कर्मचारी,असे २६४ कर्मचाऱ्यांनी पुररेषेत येत असलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यास प्रारंभ केला.त्यांना संत सेना महाराज भवन,हनुमंतराव हिंदू व्यायाम मंदिर,अंबिका तरुण मंडळ हॉल,राघोबादादा पेशवे वाडा, आनंद भुवन बाजारतळ, नवीन जय तुळजा भवानी व्यापारी संकुल,व्यापारी धर्मशाळा,के.बी.पी.विद्यालय,सेवा निकेतन इंग्लिश स्कूल,श्रीमान गोकुळचंद विद्यालय,नगरपालिका शाळा क्रं.६,कन्या विद्या मंदिर,गोरोबा काका मंदिर,परजणे लॉ कॉलेज,चित्रकला महाविद्यालय, आदी पंधरा ठिकाणी सुरक्षितरीत्या हलविले होते.त्यातून २७१ कुटुंबातील १३२५ नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे.या नागरिकांसाठी शिर्डी येथील साई संस्थानच्या सहकार्याने नाश्ता पाकिटांची व्यवस्था करण्यात आली.दरम्यान पुराचे पाणी ओसरल्यावर खरी नगरपरिषदेची कसरत सुरु झाली. बस स्थानक परिसर,गॅरेज गल्ली,गोदावरी नगर,गोरोबानगर,हनुमान नगर,जिजामाता उद्यान परिसर,माजी खा.सूर्यभान पा.वहाडणे घाट,अमर धाम,संजयनगर,सुभाषनगर,खंडाकनाला परिसर या भागात पुराचे पाण्याबरोबर आलेल्या गाळाचे साम्राज्य पसरले होते व त्यावरून होणारी रहदारी घसरण्याची व त्यातून मोठा अपघात होण्याची भीती होती.त्यामुळे पालिकेने युद्धपातळीवर या बाबत उपाययोजना करण्यास प्रारंभ केला व कर्मचाऱ्यांना या कामास जुंपून दिले त्यावर मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी सुनील आरणे व विविध अधिकारी यांची गटनिहाय नेमणूक करून हे काम अग्निशामकाचे साहाय्याने पूर्ण करण्यात आले.पुढे जाऊन शहरात रोगराई पसरणार नाही या साठी दोन पथके नेमून शहरात साठलेल्या डंबक्यांवर मलेथॉन ऑइल टाकण्यात आले.कोपरगाव ग्रामीण रुग्णालय व कोपरगाव पालिकेचे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र,अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जंतुनाशक कार्बोलीक पावडर फवारणी ,धूर व औषध फवारणी मोहीम तात्काळ सुरु करण्यात आली आहे.ती अद्याप सुरु असल्याची माहिती अध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिली आहे.
यासाठी कार्यालयीन अधीक्षक विनोद पाटील,विश्वास गोर्डे,चंद्रकांत साठे,सोपान शिंदे,राजेश गाढे,एकनाथ डाके,संजय तिरसे,गोविंद जवाद, सुरेश शिंदे,आदींसह त्यांच्या सहकाऱ्यांचे नगरपरिषदेच्या आरोग्य व बांधकाम ठेकेदार व त्यांचे कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. नगरपरिषदेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान नगरपरिषदेला अतिरिक्त मदत म्हणून तोंडावर आलेल्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नेहमीप्रमाणे तालुक्यातील वतनदार माजी मंत्री शंकरराव कोल्हे व माजी आमदार अशोक काळे,व त्यांचे सुपुत्र कर्मवीर काळे कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी आपले कार्यकर्ते व शिधापाणी नागरिकांना पुरवून आपण मदत करत असल्याचे जनतेला गाड्यांना आपली छबी लावून कानिकपाळी ओरडून सांगितले आहेच.त्याआधी पूर येण्याच्या आधीच त्यांनी त्याची चाचणी घेतल्याचेही अनेकांना आढळून आले आहे.त्यामुळे त्याची शहरात उलटसुलट चर्चा सुरु आहे.