कोपरगाव तालुका
या वर्षी डिजिटल नवरात्र महोत्सव होणार

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
दरवर्षी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने साजरा होणारा नवरात्र उत्सव यावर्षी मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
मागील सात ते आठ महिन्यापासून कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी लॉक डाऊन करण्यात आल्यामुळे अनेक बंधने घालण्यात आली होती. त्यामुळे अनेक सण-उत्सव हे घरात बसून शांततेच्या मार्गाने साजरे करावे लागले आहे. अशा परिस्थितीत येणारा नवरात्र उत्सव देखील साजरा होणार का नाही? झाला तर कसा साजरा केला जाईल याची महिलांसह सर्वांच्याच मनात उत्सुकता होती. तरीही हा नवरात्र उत्सव शासनाने दिलेल्या नियमांप्रमाणे डिजिटल पद्धतीने घरात राहूनच साजरा करण्यासाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने उत्तम नियोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे महिला भगिनी आपल्या घरात बसूनच साजऱ्या होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा या डिजिटल नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून आनंद घेवू शकणार आहे.
शनिवार (दि.१७) पासून सुरु होणा-या नवरात्र उत्सवानिमित्त महिला भगिनींसाठी अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून ऑनलाईन पद्धतीने महिला या स्पर्धेमध्ये भाग घेवू शकतात. यामध्ये कोरोना वॉरीअर्स या विषयावर रांगोळी स्पर्धा, नाविन्यपूर्ण उपवासाचे पदार्थ तयार करतांना व्हिडीओ तसेच महिलांचा सर्वात आवडता ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमात देखील महिलाभगिनी घरबसल्या सहभागी होवून पैठणी जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ऑनलाईन पद्धतीने दांडिया प्रशिक्षण व महिलांना स्वरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे. कोपरगाव तालुक्यातील सर्व देवींच्या मंदिराची माहिती, नवरात्रीच्या नऊ दिवसांचे धार्मिक महत्व, विविध दुर्गारुपांचे सादरीकरण, कुंकुमआर्चन, देवीचे पाठ, भजन आदी कार्यक्रम होणार असल्याची माहिती सौ.चैतालीताई काळे यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्र उत्सव साजरा करायचा व महिलांचे आरोग्य देखील जपायचे हा सुवर्णमध्य साधतांना आमदार आशुतोष काळे व चैताली काळे यांच्या संकल्पनेतून डिजिटल नवरात्र उत्सव साजरा करण्याच्या कल्पनेला मूर्तरूप देऊन हा उत्सव साजरा होणार आहे. जवळपास ८० टक्के महिलांना आधुनिक तंत्रज्ञान अवगत झाले आहे. त्यामुळे दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या नवरात्र उत्सवाला ज्याप्रमाणे महिला भगिनींचा उस्फुर्त प्रतिसाद मिळतो तोच प्रतिसाद या डिजिटल नवरात्र उत्सवाला देखील मिळणार आहे. रोज सायंकाळी ७ ते ८ या वेळेत आमदार आशुतोष काळे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. सर्व महिला भगिनींनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन या कार्यक्रमाचा आस्वाद असे आवाहन प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने केले आहे.