कोपरगाव तालुका
..या ग्रामपंचायतीचे दप्तर केले जप्त,चौकशी सुरु !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील डाऊच बुद्रुक ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाने आपले दप्तर गत तीन वर्षांपासून लिहिले नसून त्यात अनेक गैरप्रकार झाले असल्याची असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून या बाबत नुकतीच ग्रामस्थांनी तेथील सिमेंट रस्त्याच्या तक्रारी केल्याने कोपरगाव पंचायत समितीचे उपसभापती अर्जुनराव काळे यांनी त्या ठिकाणी भेट दिली असता तेथे उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांनी तक्रारी केल्याने सदर प्रकरणी उपसभापती काळे यांनी ते दप्तर ताब्यात घेण्याचे आदेश देऊन चौकशी करण्याचे आदेश दिल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.
दरम्यान या ग्रामसेवकास आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याची माहिती असून ग्रामपंचायतीला दहा लाखांचा पुरस्कार मिळालेला आहे.या दहा लाखांचा थातुरमातुर गांडूळ प्रकल्प दाखवून त्या निधीचा बट्ट्याबोळ केल्याची माहिती माहितगार सूत्रांनी दिली आहे.त्यामुळे साठ ते सत्तर हजार रुपये घेऊन असे काम होत असेल तर ग्रामविकासाच्या योजना ग्रामस्थांपर्यंत कशा पोहचत असतील असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.या बाबत गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला असून त्याबाबत चौकशी अहवाल तयार होऊन सदर ग्रामसेवकास नोटीस बजावली असल्याचे सांगितले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,ग्रामपंचायतचा कारभार चालविण्यासाठी ग्रामसेवकांची नेमणूक करण्याची ग्रामपंचायत अधिनियमात तरतूद करण्यात आली आहे.त्यांनी सरपंच व सदस्य यांनी जे ठराव बहुमताने केले असतील त्याची अंमलबजावणी करावी असे अभिप्रेत आहे.मात्र कोपरगाव तालुक्यातील डाऊच बुद्रुक ग्रामपंचायत त्याला अपवाद ठरली आहे.या ठिकाणी तीन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीची निवडणूक संपन्न झाली होती.त्यात सरपंचपद राखीव असल्याने त्या ठिकाणी आदिवासी महिलेची निवड करण्यात आली होती.मात्र त्या ठिकाणी सरपंच निवडीची प्रक्रिया पार पडल्यानंतर ती वादात गेली असून वर्तमानात हे पद रिक्त आहे.मात्र पहिल्या सरपंच निवडीच्या पहिल्या बैठकीचे इतिवृत्त लिहिल्यानंतर त्या ठिकाणी तीन वर्ष उलटूनही व अनेक नियमित मासिक व ग्रामसभा संपन्न होऊनही त्या प्रत्यक्षात लिहिल्याच गेल्या नाही.या बाबत तेथील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी अनेक तक्रारी गटविकास अधिकारी यांचेकडे केल्या होत्या.मात्र त्याची दखलच घेतली गेली नाही.या बाबीची कुजबुज उपसभापती अर्जुनराव काळे यांच्या कानावर आली होती.मात्र कार्यबाहुल्यामुळें त्याना तिकडे जाता आले नव्हते.मात्र त्यांनी त्यानंतर तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठीचा निर्णय घेतला होता.व त्या नुसार त्यांनी दि.२१ सप्टेंबर रोजी त्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत आदिवासी वस्तीत असलेल्या सिमेंटच्या रस्त्याच्या तक्रारी आल्याने त्या ठिकाणी पाहणी दौरा आयोजित केला होता.त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या ग्रामपंचायतच्या सदस्यांनी या बाबत त्यांचे लक्ष वेधून घेतले होते.त्यावेळी त्यांनी हजर कर्मचारी यांच्या करवी तेथिल दप्तर प्रथमदर्शनी पाहिले असता त्यांना धक्का बसला कारण सरपंच निवडीची पहिली सभा संपन्न झाल्यानंतर गत तीन वर्षात एकही बैठकीचे इतिवृत्त लिहिले गेले नव्हते हे विशेष !
त्यांनी तातडीने या ठिकाणी असतानाच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व ग्रामविस्तार अधिकारी यांना या बाबीची जाणीव करून दिली व तातडीने त्या ठिकाणी हजर होऊन ते ताब्यात घेण्याचे आदेश दिले.परिणाम स्वरूप अधिकाऱ्यांनी त्याबाबत कारवाई केली आहे.व सर्व दप्तर ताब्यात घेतले असता त्यात अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्याची माहिती आहे.त्यामुळे ग्रामसभा व नियमित मासिक बैठकीच्या इतिवृत्तावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या ग्रामपंचायतीचा कारभार हा रामभरोसे असल्याचे निष्पन्न झाले आहे.आता या पुढे गटविकास अधिकारी कारवाई करणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.