जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर या वर्षीचा गणेश उत्सव सर्व नागरिकांनी अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाच्या वेळी गणेश भक्तांची गर्दी होऊन गणेश भक्तांना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील नागरिकांना विसर्जनरथ उपलब्ध करून देऊन परमार्थाकडून पर्यावरणाकडे असा आगळावेगळा संदेश दिला आहे.
गणेश भक्तांना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी आ. आशुतोष काळे यांनी परमार्थाकडून पर्यावरणाकडे या उद्देशातून विसर्जनरथ उपलब्ध करून देऊन गणेश भक्तांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी विसर्जन स्थाची संकल्पना कोपरगाव शहरात राबविली आहे.
या वर्षी मार्च महिन्यापासून सर्वच सण साजरे करतांना कोरोना संकटामुळे मर्यादा आल्या आहेत. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून सर्व जाती-धर्माचे नागरिक आपल्या परंपरेनुसार धार्मिक सण-उत्सव साजरे करत आहे. या सण-उत्सवातून सर्व गणेश भक्तांचा आवडता सण गणेशोत्सव देखील सुटला नाही. त्यामुळे प्रत्येक गणेश भक्ताला यावर्षी आपल्या भावनांना मुरड घालून अतिशय साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा लागला आहे. मोठ्या समूहाने नागरिक एकत्र आल्यानंतर कोरोनाची बाधा होण्याचा धोका जास्त असतो हे ओळखून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतांना या गणेश भक्तांना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी आ. आशुतोष काळे यांनी परमार्थाकडून पर्यावरणाकडे या उद्देशातून विसर्जनरथ उपलब्ध करून देऊन गणेश भक्तांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी विसर्जन स्थाची संकल्पना कोपरगाव शहरात राबविली.
या विसर्जन रथाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी गणेश भक्तांच्या घरोघरी जावून गणेश मूर्ती जमा करून कोपरगाव नगरपरिषदेकडे दिल्या. कोपरगाव नगरपरिषदेने या गणेश मूर्तींचे विधिवत पूजन करून तयार करण्यात आलेल्या विसर्जन हौदात त्यांचे विसर्जन केले जाणार आहे. या विसर्जन हौदामध्ये अमोनियम बायकार्बोनेट रासायनिक द्रव्य पदार्थांचा वापर करून या मूर्ती विरघळवण्यात येणार आहे. त्यामुळे दरवर्षी तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या गोदावरी नदीचे गणेश मूर्तीसाठी वापरले जाणारे पीओपी व मूर्तीच्या रंगातील विषद्रव्य पाण्यात मिसळून पाण्यातील जलचर होणाऱ्या बाधेपासून वाचणार असून मूर्ती विसर्जनामुळे मोठ्याप्रमाणात गोदावरी नदीचे होणारे प्रदूषण टाळले जाणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी भग्नावस्थेत दिसणाऱ्या बाप्पांच्या मूर्ती पाहून गणेश भक्तांची होणारी कासावीस थांबविण्याचा आमदार आशुतोष काळे यांनी यशस्वी प्रयत्न केला आहे.
या विसर्जन रथामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गणेश मूर्ती जमा करण्याचा प्रारंभ करण्यात आला.
याप्रसंगी नगराध्यक्ष विजय वहाडणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, गटनेते नगरसेवक वीरेन बोरावके, मंदार पहाडे, सुनील शिलेदार, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, डॉ. तुषार गलांडे, फकीरमामु कुरेशी, गणेश लकारे, संदीप देवळालीकर, चंद्रशेखर म्हस्के, उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे, बांधकाम अभियंता दिगंबर वाघ आदी उपस्थित होते.