कोपरगाव तालुका
कोपरगावात..या कोरोना योद्धयांचा सन्मान
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-प्रतिनिधी)
कोपरगावात भारताचा ७३ वा स्वातंत्र्य दिन आज सकाळी उत्साहात संपन्न झाला आहे.या वेळी प्रमुख आकर्षण असलेल्या कोपरगाव तहसील कार्यालयात तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावला तर कोपरगाव नगरपरिषदेत मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी राष्ट्रध्वज फडकावल्या नंतर कोरोना साथीत तालुक्यातील नागरिकांचे प्राण वाचविण्यात अहंम भूमिका निभावणाऱ्या डॉक्टर,परिचारिका,आशा सेविका,स्वच्छता कर्मचारी यांचा आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे.मात्र या वेळी या उत्सवावर कोरोना साथीचे सावट असल्याने मर्यादित नागरिकांत हा उत्सव साजरा करण्यात आला आहे.कोरोना साथीत तालुका व शहरातील नागरिकांना या साथीपासून वाचविण्यात शहर व तालुका आरोग्य विभागासह पोलीस,महसूल ग्रामपंचायत अधिकारी,कर्मचारी आदींनी मोठी भूमिका निभावली आहे.त्यांची दखल तालुका प्रशासने घेतली असून त्यांचा गौरव केला आहे.
सध्या कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ४०३ झाली आहे.त्यात ७८ रुग्ण सक्रिय आहेत,तर आतापर्यंत ५ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.२४ टक्के आहे.आतापर्यंत २ हजार २५६ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ९ हजार ०२४ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १७.८६ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ३२० इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ७९.४० आढळले आहे.तालुक्यात आतापर्यंत पाच जणांना मृत्यूने गाठले आहे.तरी आरोग्य व स्वच्छता विभागाने यात निर्णायक भूमिका घेतली यात प्रत्ययवाद नाही.
सदर प्रसंगी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती पौर्णिमा जगधने,गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,काळे सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,माजी उपाध्यक्ष पद्मकांत कुदळे,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,उपसभापती अर्जुन काळे,प्रशांत वाबळे आदी प्रमुख मान्यवरांसह नगरपरिषद व पंचायत समिती,तहसील,तालुक्यातील प्रमुख आस्थापने आदींचे अधिकारी व कर्मचारी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन आ.आशुतोष काळे,नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले आहे.तर कोविड-१९ या साथीचा आपण कसा सामना केला याचा अनुभव डॉ.मंजुषा गायकवाड यांनी विशद केला आहे.उपस्थितांचे आभार स्वच्छता दूत सुशांत घोडके यांनी मानले आहे.