कोपरगाव तालुका
कोपरगावात शिवभोजन थाळीचे उदघाटन संपन्न
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिवभोजन थाळी सुरु झाल्यामुळे गरजू नागरिकांची मोठी सोय झाली आहे.गरजूंसाठी आजपासून रोज सकाळी ११ ते ३ या वेळेत तहसील कार्यालय व बागुल वस्ती (कोपरगाव जिनिंग प्रेसिंग सोसायटीच्या शेजारी) या दोन ठिकाणी शिवभोजन थाळी उपलब्ध असणार आहे.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केलं. शिवसेनेनं आपल्या वचनपत्रात दिलेलं शिवथाळीचं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेवर येताच जाहीर केलं होते. दहा ऐवजी आता पाच रुपयांमध्ये राज्यभरात शिवथाळीची योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा सरकारने नुकतीच केली आहे.मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवथाळीच्या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी किमान एक भोजनालय तसंच प्रत्येक भोजनालयात कमाल ५०० थाळी सुरू करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली होती. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याची व्याप्ती तालुका पातळीवर वाढविण्यात आली आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत तहसील कार्यालय कोपरगाव येथे आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
यावेळी बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, कोरोनाच्या संकटावर प्रशासनाकडून राबविण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे आज कोपरगाव तालुका कोरोनामुक्त आहे. हीच परिस्थिती पुढेही अशीच राहावी यासाठी नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. शिवभोजन थाळी सुरु झाल्यामुळे गरजू नागरिकांची मोठी सोय झाली आहे.गरजूंसाठी आजपासून रोज सकाळी ११ ते ३ या वेळेत तहसील कार्यालय व बागुल वस्ती (कोपरगाव जिनिंग प्रेसिंग सोसायटीच्या शेजारी) या दोन ठिकाणी शिवभोजन थाळी उपलब्ध असणार आहे.गरजू नागरिकांनी सुरक्षित अंतर पाळून शिवभोजन थाळीचा लाभ घ्यावा व प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.यावेळी आ.काळे यांच्याहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात गरजूंना शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात आले. कोपरगावात शिवभोजन थाळी सुरु करण्यात आल्यामुळे गरजू नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.