देश-विदेश
राज्यातील जनतेने शरद पवार आणि उध्दव ठाकरेंना घरी बसवले-या बड्या नेत्याचा दावा
न्युजसेवा
शिर्डी – (प्रतिनिधी )
राज्यातील जनतेने महायुतीला एैतिहासिक विजय प्राप्त करुन देतानाच दगा फटक्याची राजनिती करणा-या शरद पवार आणि उध्दव ठाकरेंना घरी बसविण्याचे मोठे काम केले आहे.विकासाची साखळी मजबुत करायची असेल तर,पंचायत ते पार्लामेंट भगवा फडकविण्याचे आवाहन केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी शिर्डी येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रदेश आधिवेशनाचा समारोप केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थित झाला. महायुतीला एैतिहासिक यश मिळवून दिल्याबद्दल राज्यातील जनतेचे आणि उपस्थित कार्यकर्त्याचे आभार मानून महाराष्ट्राच्या निकालाने देशाला नवा संदेश दिला असल्याचे उद्गारही त्यांनी काढले. विधानसभा निवडणूक ही केवळ महाविकास आघाडीला पराभूत करण्यासाठी किंवा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी नव्हती तर, विचाराला सोडून राजकारण करणा-या उध्दव ठाकरेंना त्यांची जागा दाखविण्यासाठी होती असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
सदर प्रसंगी भाजपाचे प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यअध्यक्षा रविंद्र चव्हाण, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे,संघटन मंत्री शिवप्रसाद,रावसाहेब दानवे,केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ,पियुष गोयल,प्रकाश जावडेकर,खा.अशोक चव्हाण,माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह राज्य मंत्री मंडळातील सर्व मंत्री,आमदार, खासदार आणि राज्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्राला विकासाच्या रस्त्यावर आणण्यासाठी यापुर्वी महायुती सरकारने काम केले.हिंदुत्वाच्या विचारांची मुठ आणि विकासाचा धारा घेवून देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली मोठे काम सुरु आहे.लोकसभा निवडणूकीत विजयाची घोडदौड ही कायम राहीली.याकडे लक्ष वेधून अमित शाह म्हणाले की,”नरेंद्र मोदी यांना तिस-यांदा पंतप्रधान करुन एन.डी.ए.ला मोठी साथ दिली.राज्यातही जनतेने केवळ भाजपालाच नाही तर शिवसेना आणि राष्ट्रवादीलाही विजयी करण्याचे मोठे काम केले आहे. एकप्रकारे विकासाच्या राजकारणावर जनतेने केलेले हे शिक्कामोर्तब ठरले.सनातन संस्कृती आणि हिंदुत्वाच्या विचाराला सुध्दा राज्यातील जनतेने पाठबळ दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
शरद पवार यांचे नाव घेवून अमित शाह यांनी टिका करताना एवढे वर्ष राज्यात मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री राहूनही महाराष्ट्राला त्यांना पाणी देता आले नाही.तसेच महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करु शकले नाहीत.परंतू आपले सरकार आता येत्या काही वर्षात सिंचनामध्ये मोठे काम करणार असून,शेतक-यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी सुध्दा काम करणार आहे.पुढच्या निवडणूकीला सामोरे जाण्यापुर्वी महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प सुध्दा आपल्याला करायचा असल्याचे त्यांनी सांगितले.
२०२४ साल भारतीय जनता पक्षाला एैतिहासिक ठरल्याचा दाखला देवून हरियाणा,आंध्रप्रदेश,ओरीसा आणि सिक्कीम मध्ये एनडीएला मिळालेले यश हे महत्वपूर्ण राहीले. आम्ही हारणारे नाही तर,संघटन आणि निवडणूक जिकंण्याच्या रनणीतीमुळे कार्यकर्त्यांचा विजय होतो हे पक्षाने दाखवून दिले आहे.त्यामुळेच राज्यात दिड कोटी सदस्य संख्या पुर्ण करण्याचे उदिष्ठ ठेवा.आगामी काळात महानगरपालिका,नगरपालिका,जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका आहेत.विकासाची साखळी मजबुत करायची असेल तर,स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत महायुतीला विजयी करण्याचा संकल्प या आधिवेशनातून आपण करुयात असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात महायुतीने केवळ निवडणूक जिंकली नाही तर,लोकांचा विश्वास जिंकला आहे असे सांगून हा विजय मी कार्यकर्त्यांना समर्पित करतो.सत्ताही सुखासीन होण्यासाठी नसते तर,आम्ही जनतेला किती सुखी करतो यासाठी असते.येणा-या काळात जनतेसाठी आम्हाला काम करायचे आहे.सिंचन क्षेत्रामध्ये नदीजोड प्रकल्पावर लक्ष केंद्रीत करुन दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे आहे.महाराष्ट्राला उर्जावान बनविण्यासाठी अपारंपारिक उर्जाक्षेत्रात काम करण्याचा आमचा निर्धार असून,५२ टक्के उर्जा अपारंपारिक क्षेत्रातून निर्माण करण्याचे आम्ही ठरविले असल्याचे फडणवीस म्हणाले.
राज्यात लोकसभा निवडणूकीत जाणीवपूर्वक व्होट जिहाद,सेट नॅरेटीव्ह करुन,वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला.परंतू आपली लढाई आता या आराजकतावादी शक्तीशी असून,यांना पराभूत केल्याशिवाय आता थांबायचे नाही असे स्पष्ट करुन,मुख्यमंत्री फडणवीस यांनी मालेगावचा उल्लेख करुन या राज्यात घुसखोरांचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे, हे आपल्या राज्यात आता नको.यासाठी आपल्याला उपाय योजना कराव्या लागतील.पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर भर देवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणसाच्या जीवनात सुलभता आणण्यासाठी जो पारदर्शकतेचा मंत्र दिला आहे त्याला अनुसरुनच सरकार काम करेल.पुढील शंभर दिवसांचा कार्यक्रम सरकारने ठरविला असून,संघटना म्हणून सुध्दा आता शंभर दिवसांचा कार्यक्रम कार्यकर्त्यांना द्यावा.महायुती सरकारने दिलेले सर्व आश्वासनं पुर्ण होणार असून, राज्यातील जनतेच्या अपेक्षा सरकार पुर्ण करेल अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली.
याप्रसंगी राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे,प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनीही आपल्या भाषणात उपस्थितांना मार्गदर्शन केले. सरकार आणि संघटन एकत्रितपणे काम करुन, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विचार आणि विकास पोहोचवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चौकट
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रभू श्रीरामांची मुर्ती देवून सन्मानित केले.आपल्या स्वागतपर भाषणात मंत्री विखे पाटील यांनी हे एैतिहासिक आधिवेशन शिर्डी विधानसभा मतदार संघात घेण्याची संधी दिल्याबद्दल पक्षनेत्यांचे आभार मानून महायुतीला मिळालेल्या यशामुळे जाणते राजे आणि अनेक भावी मुख्यमंत्री घरात बसले.संपूर्ण राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी एकजुटीने केलेल्या कामामुळेच महायुतीला यश मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.