शैक्षणिक
कोपरगाव तालुक्यात शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांविना सुरु-गटविकास अधिकारी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळा आज लहानग्यांच्या किलबिलटा शिवाय सुरू झाल्या असून कोरोना विषाणूच्या साथीचे सावट असल्याने विद्यार्थ्यांचा ओसंडून वाहणारा उत्साहाचा अभाव जाणवला आहे.मित्र मैत्रीणींच्या भेटीची ओढ,नव्या पुस्तकांचा अनोखा सुगंध,नवा वर्ग,नवा गणवेश असं नेहमीचं चित्र यावेळी दुर्दैवाने दिसलं नाही.
“सुमारे तीन महीन्यांपासुन बंद असलेल्या शालेय परिसराची साफसफाई आठवडभरापासुन सुरू होती.आज ग्राम पंचायतीच्या वतीने वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असून विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी शाळेत हातधुनी स्थानके निर्माण करून दिली आहेत,ती अधिक चांगली करणे.ज्या ठिकाणी ती नाहीत अशा ठिकाणी ती नव्याने उभारणे.शिवाय मुलामुलींसाठी असणारी शौचालये दुरूस्त करून घेणे याबाबत आवश्यक तरतुद केली आहे”-सचिन सु र्यवंशी,गटविकास अधिकारी,कोपरगाव पंचायत समिती.
गतवर्षी कोरोनाने जगभर कहर उडवून दिला होता आता कुठे कोरोनाची दुसरी लाट भारतात कमी झाली असल्याने शिक्षण विभागाने आपल्या शाळांची कवाडे किलकिली केली असून केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आज शाळा सुरु अकरण्यात आल्या आहेत मात्र त्या विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत विश्वास बसत नसेल पण हे खरे आहे.कोपरगाव तालुक्यात याची अनुभूती आली आहे.कोपरगाव पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी यांनीच याला दुजोरा दिला आहे.कोरोनाच्या पार्श्वभुमीवर खबरदारी म्हणुन आज विद्यार्थ्यांशिवाय शाळा सुरू करण्यात आल्या.आज शाळेच्या पहिल्याच दिवशी तालुक्यातील चांदेकसारे,पोहेगाव,सोनेवाडी येथील जिल्हा परिषद शाळांना भेटी दिल्या.सरपंच,मुख्याध्यापक,शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामसेवक यांचेशी चर्चा करून स्थानिक परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती दिली आहे.
अनेक शाळांमध्ये संगणक,प्रोजेक्टर आदी साहीत्य दुरूस्ती अभावी धुळ खात पडून आहे.कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती इतक्यात निवळण्याची शक्यता नसल्याने डिजीटल साधनांद्वारे अध्यापन करणे गरजेचे आहे.त्यामुळे अशा साहित्याची दुरूस्ती करणे तसेच गरजेनुसार नव्याने उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे.अखंडित वीजपुरवठा,इंटरनेट संलग्नता याबाबींची उपलब्धता यासाठी शालेय स्तरावर ठोस तरतूद करावी लागणार आहे.अॅन्ड्राॅईड मोबाईलची अनुप्लब्धता हा ग्रामीण भागातील पालकांना भेडसावणारा महत्वाचा प्रश्न आहे.गतवर्षी जिल्हा परिषदेने विकसित केलेल्या स्वाध्याय पुस्तिका तसेच शिक्षकांनी दिलेल्या गृहभेटी यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता आले.यावर्षी आणखी एक पाऊल पुढे टाकत डिजीटल अध्यापनासाठी आवश्यक कौशल्ये शिक्षकांना आत्मसात करावी लागणार आहेत.सततच्या सुट्या,मोबाईल-टी.व्ही.चा अतिवापर यामुळे मुलांच्या भावविश्वात प्रचंड बदल घडून आले आहेत.अशावेळी त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे.
अनेक ग्रामपंचायतीनी केंद्रीय वित्त आयोग निधीच्या माध्यमातुन गावातील जिल्हा परिषद शाळांचे रूपडे पालटले आहे.सद्यस्थितीत ग्रामपंचायत आणि लोकसहभाग याद्वारे शाळांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजित आहे.आज काही तंत्रस्नेही शिक्षकांशी चर्चा करून त्यांची डिजिटल शिक्षण प्रणाली संदर्भात मते जाणुन घेतली.कोरोनाचा उद्रेक शमल्यानंतर पुन्हा लवकरच शाळा गजबजतील अशी माहितीही गटविकास अधिअकारी सचिन सूर्यवंशी यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.