नगर जिल्हा
आ. काळेंचा महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रलंबित प्रश्नांना चालना देण्याचा निर्धार

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून विकासकामांसाठी जास्तीत जास्त निधी आणून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विकासाच्या प्रलंबित प्रश्नांना चालना देणार असल्याचा निर्धार कोपरगावचे आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील खोपडी येथे एका कार्यक्रमात बोलताना केला आहे.
खोपडी परिसरातील रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. ग्रामपंचायतींनी अशा रस्त्यांचे प्रस्ताव सादर करावे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून तसेच महाविकास आघाडी सरकारच्या मदतीने पाठपुरावा करून या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावू-आ. आशुतोष काळे
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत कोपरगाव तालुक्यातील खोपडी येथे ५५.६० लक्ष रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्या सोनाली साबळे होत्या.
यावेळी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने, जी.प. सदस्या सोनाली साबळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब बारहाते, सुधाकर रोहोम, उपसभापती अर्जुन काळे, सदस्य मधुकर टेके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष चारुदत्त शिनगर, अॅड. शरद जोशी, दादासाहेब साबळे, राहुल जगधने, प्रसाद साबळे, विस्तार अधिकारी दत्तात्रय रानमाळ, उपअभियंता उत्तम पवार, शाखा अभियंता श्री सातपुते, सरपंच संभाजीराव नवले, उपसरपंच शिवाजीराव वारकर, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि,महाविकास आघाडी सरकार सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करत आहे त्यामुळे प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न राहील. खोपडी परिसरातील रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. ग्रामपंचायतींनी अशा रस्त्यांचे प्रस्ताव सादर करावे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून तसेच महाविकास आघाडी सरकारच्या मदतीने पाठपुरावा करून या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावू. मतदार संघातील विविध गावात विकासकामे सुरु असतांना विकासकामांचा दर्जा चांगला राहावा यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व जागरूक नागरिकांनी कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष ठेवावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी शेवटी केले आहे.