नगर जिल्हा
शहाजापूर घटनेतील ..तो आरोपी जेरबंद,सात दिवसांची पोलीस कोठडी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याला हादरवून सोडणाऱ्या शहाजापूर येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा आरोपी अमोल निमसे यास अखेर चौथ्या दिवशी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सिन्नर तालुक्यातील वडांगळी शिवारात मोठ्या शिताफीने अटक केली असून काल त्यास कोपरगाव येथील विशेष न्यायालयासमोर कोपरगाव तालुका पोलिसांनी हजर केले असता दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर विशेष तथा जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यास सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपीस अटक करावी म्हणून सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत नागरिकांनी गाव बंद ठेऊन आरोपीस आठ दिवसात अटक करावी अशी मागणी लावून धरली होती.पोलिसांनी त्यांना आरोपीच्या मागावर पोलीस पथके असल्याचे सांगून वेळ निभावून नेली होती.मंगळवारी रात्री संशयित आरोपी अटक केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील वेळापूर ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेल्या व मजुरी करून आपला चरितार्थ चालविणाऱ्या कुटुंबातील नऊ वर्षाची अल्पवयीन मुलगी तेरा डिसेंबर रोजी सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यावर घरी न परतताच बेपत्ता झाल्याने वेळापूर परिसरात खळबळ उडाली होती.तिच्या नातेवाईकांनी आसपास नातेवाईक व ओळखीच्या माणसांकडे शोध घेऊनही ती मिळून न आल्याने तिच्या पालकांनी कोपरगाव तालुका पोलिसांकडे ती अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची तक्रार त्याच रात्री सव्वा दहाच्या सुमारास केली होती.त्यामुळे पोलीस अधिकारीही चक्रावून गेले होते.त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी चलचित्रणाच्या फिती तपासल्या असता ती एका तरुणाबरोबर एका दुचाकीवर पुढे टाकीवर बसून जात असल्याचे आढळून आले होते.त्या नंतर सदर मुलगी या आरोपीने सकाळी लासलगाव-शिर्डी रस्त्यावरील काळे सहकारी कारखान्याकडे जाणाऱ्या कमानीं जवळ सोडून तो परागंदा झाला होता.त्यांनतर गायब मुलगी सापडल्यावर तिची वैद्यकीय तपासणी केल्यावर तिच्यावर अत्याचार केल्याचे उघड झाले होते.त्यानंतर पोलिसांनी सदर गुन्ह्यात कलमे वाढवून गुन्ह्याची व्याप्ती वाढवून तपासाला वेग दिला होता.मात्र आरोपी गत चार दिवसापासून सापडत नव्हता.दोन दिवसांनी आरोपी सिन्नर तालुक्यातील शहा,पंचाळे भागात आढळला होता.मात्र त्याने गुंगारा दिला होता.त्यांनतर त्याच्या मागावर चार पोलीस पथके नेमण्यात आली होती.अखेर हा आरोपी कोपरगाव तालुक्याच्या लगत असलेल्या सिन्नर तालुक्यातील वडांगळी परिसरात मंगळवार दि.१७ डिसेंबरच्या रात्री साडे दहाच्या सुमारास मोठ्या शोध मोहिमेनंतर आढळून आला होता.त्याला कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे.आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास विशेष तथा जिल्हा सत्र न्यायालयाचे समोर हजार केले असता दोन्ही बाजूनी युक्तिवाद करण्यात आल्यानंतर त्यास न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.त्यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता.बघ्यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती.