नगर जिल्हा
श्रीरामपूर शहरात महिलेचा विनयभंग,चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
श्रीरामपूर (प्रतिनिधी)
श्रीरामपूर शहरातील के.व्ही.रोडवर राहणार्या एका महिलेस शिवीगाळ करुन, तिला झापड मारुन, छातीला हात लावून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील के.व्ही. रोड परिसरात राहणार्या एक महिला घरात असताना बाळासाहेब इंद्रभान जोशी, आकाश बाळासाहेब जोशी (वॉर्ड नं 7, श्रीरामपूर), नानासाहेब रखमाजी गाढे (बेलापूर), भास्कर रामचंद्र चव्हाण (पुणतांबा) यांनी घरामध्ये जावून कपाटाची उचक पाचक करुन कपाटाच्या कप्प्यामधील एक धनादेश, शेतीच्या व्यवहाराचे कागदपत्रे व काही दस्तऐवज चोरुन नेला. तसेच त्यातील एकाने फिर्यादीस शिवीगाळ केली. झापड मारुन तिला खाली पाडून छातीला हात लावून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले आहे.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात वरील चार जणांविरुध्द भा. दं. वि. कलम 354, 380, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल श्री. कोरडे हे करत आहेत.