जयंती,पुण्यतिथी अभिवादन
कोपरगावात…या दिवशी माजी खासदारांचे पुण्यस्मरण

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
सहकारात अग्रणी असलेल्या कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे अनेक वर्षे अध्यक्ष पद सांभाळणारे माजी खा.स्व.शंकररावजी काळे यांच्या १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त गुरुवार दि.०५ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

दरम्यान या कार्यक्रमानिमित गुरुवारी सकाळी ९ वाजता कारखाना कार्यस्थळावरील कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान येथे पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत ह.भ.प.उद्धव महाराज मंडलिक यांचे सुश्राव्य हरिकीर्तन होणार आहे.
कर्मवीर शंकरराव काळे यांच्या समाजाभिमुख कार्याचा गौरव आणि त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमास माजी आ.अशोक काळे,गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका पुष्पाताई काळे,आ.आशुतोष काळे,जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांच्यासह कारखान्याचे उपाध्यक्ष,सर्व संचालक मंडळ,मित्र मंडळाचे सदस्य,संलग्न संस्थांचे पदाधिकारी,कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास कोपरगाव तालुक्यातील शेतकरी,कार्यकर्ते,हितचिंतक आणि नागरिकांनी या पुण्यस्मरण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे उपाध्यक्ष नारायण मांजरे यांनी शेवटी केले आहे.



