कृषी विभाग
…या तालुक्यात घराचे पत्रे उडाले,शेतकरी रस्त्यावर !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात आज दुपारी ४.३० च्या सुमारास विजांच्या कडकडासह आलेल्या वादळी पावसाने माहेगांव देशमुख येथील शेतकरी रवींद्र हरीभाऊ काळे यांच्या घरावरील पत्रे उडून गेले असून होत्याचे नव्हते झाले आहे.तर शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती समोर येत आहे.त्यामुळे गहू,हरभरा,मका,ज्वारी आदी रब्बी पिकांचा शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतल्याची भावना निर्माण झाली आहे.

दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांचेशी संपर्क केला असता त्यांनी माहेगांव देशमुख येथील शेतकरी रवींद्र काळे यांच्या घराचे पत्रे उडाले असल्याची माहिती दिली आहे.अन्यत्र जीवित नुकसान झाल्याची माहिती नाही.मात्र खरीप पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत असल्याचे दिसून आले आहे.
भूमध्य समुद्र,कॅस्पियन समुद्र तसेच काळा समुद्र या पश्चिमेकडील भागातून अफगाणिस्तान,पाकिस्तान मार्गे येणाऱ्या बाष्पुयुक्त वाऱ्यामुळे हा पाऊस पडत असल्याचा तज्ञांचा होऱ्हा आहे.यापूर्वी हा पाऊस मार्च,एप्रिल महिन्यात केवळ काश्मीर आणि हिमाचल प्रदेश,पंजाब आदी भागात हा पाऊस पडत होता. मात्र अलीकडील काळात दक्षिण भारतात बहुतांश तापमान ४० अंशाच्या पुढे गेल्याने हा पाऊस आता महाराष्ट्रात खेचला जात आहे.परिणामी महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातले असून,शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.भंडारामध्ये मका, आंबा,पालेभाज्या आणि वाशिममध्ये हळद-कांद्याचे नुकसान झाले आहे.पुणे, कोल्हापूरसह अनेक शहरांत पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले असून,लाखो हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.अवकाळी पावसाच्या थैमानाने काढणीस आलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांचा तोंडचा घास काढून घेतल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान आजच्या वादळी पावसाने कोपरगाव तालुक्यातील घराच्या झालेल्या नुकसानीचे महसूल विभागाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी कार्यवाही करावी असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी तालुका प्रशासनास दिले असल्याची माहिती गोदावरी-परजणे पाटील सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी केलेल्या मागणी नंतर दिले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्याबाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील पूर्व भाग,पश्चिमआणि नैऋतेकडील भागात,गव्हाची,मका आदी पिकांची पोती तर कांद्याच्या गोण्या भिजल्या असल्याचे दिसून येत आहे.यामुळे शेतकऱ्यांची स्थिती दयनीय बनली असल्याचे दिसून येत आहे.या अचानक आलेल्या पावसाने काढणीला आलेले पीक आडवे झाले,यामुळे बळीराजा चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.संवत्सर परिसरातही या पावसाने मोठे नुकसान केल्याची माहिती आमचे प्रतिनिधी शिवाजी गायकवाड यांनी दिली आहे.



