विशेष दिन
ज्येष्ठांनी तणावमुक्त होऊन जगण्याचा आनंद घ्या -देशमुख

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
ज्येष्ठ नागरिकांना ज्या बाबी नकारात्मक वाटतात,त्यापासून त्यांनी लांब राहायलां हवे.आनंदी जीवन जगण्यासाठी हे महत्त्वाचे असून शरीराप्रमाणे मेंदूलाही हालचाल हवी असल्याने शब्दकोडी सोडवा,वृत्तपत्र वाचा, लहान मुलांशी बोला व तणावमुक्त होऊन जगण्याचा प्रयत्न करा असे आवाहन प्रसिद्ध व्याख्याते अशोक देशमुख यांनी कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य चेंबर ऑफ कॉमर्सच्या रिटेलर्स फोरमचे अध्यक्ष सुधीर डागा यांची निवड झाल्याबद्दल समताचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे व उत्तमभाई शहा यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,एक पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला आहे.
ज्येष्ठ नागरिकांनी आपले जीवन आनंदी, समाधानी आणि उत्साही ठेवण्यासाठी आरोग्य, मानसिक शांती आणि सामाजिक सहभाग या तीन गोष्टींवर भर देणे आवश्यक आहे.वयाच्या या टप्प्यावर जबाबदाऱ्या कमी झालेल्या असतात,त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढून जीवन जगण्याचा हा एक उत्तम काळ आहे.त्यांना आपला काळ सुकर जावा यासाठी कोपरगाव येथील सहकारातील अग्रणी असलेल्या समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी हसत खेळत तणावमुक्ती या कार्यक्रमाचे प्रसिद्ध वक्ते अशोक देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन कलश बँकेट हॉल येथे आयोजित केले होते.त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष ओमप्रकाश कोयटे हे होते.

सदर प्रसंगी व्याख्याते अशोक देशमुख यांनी ज्येष्ठ नागरिकांना आपल्या खास शैलीत नागरिकांना प्रसिद्ध मराठी गीतावर नाचण्यास उद्युक्त केले असून सर्वांना मनमुराद हसवले असून जेष्ठ नागरिकांचा तणाव कुठच्या कुठे पळवून लावला असल्याचे दिसून आले आहे.समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेच्या माजी अध्यक्षा सुहासिनी कोयटे,कोपरगाव व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजय बंब,उत्तमभाई शहा,दत्तोपंत कंगले,डॉ.विकास आचारी,सुधाताई कैलास ठोळे,गोरे सर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आज सकाळी आयोजित केलेल्या जलद चालणे स्पर्धेत यशस्वी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला आहे.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,” नोकरी किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे पूर्वी ज्या गोष्टी करता आल्या नाहीत,त्या आता करा.त्यात त्यांनी वाचन,संगीत,बागकाम,चित्रकला किंवा स्वयंपाक आदींचा उल्लेख केला आहे.सतत आजारपण,चिंता किंवा भूतकाळातील वाईट गोष्टींचा विचार करणे टाळा.नेहमी सकारात्मक विचार करा.मानसिक स्वास्थ्यासाठी ७ ते ८ तासांची शांत झोप खूप महत्त्वाची आहे.नागरिकांनी आपला सामाजिक सहभाग आणि संवाद वाढवणे गरजेचे आहे.समवयस्क मित्रांसोबत वेळ घालवा,गप्पा मारा.ज्येष्ठ नागरिक कट्टा किंवा क्लबमध्ये सहभागी व्हा.नातवंडांसोबत खेळा,त्यांना गोष्टी सांगा. त्यांच्याशी संवाद ठेवल्याने मन प्रसन्न राहते.स्मार्टफोन,व्हॉट्सॲप किंवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून दूर राहणाऱ्या नातेवाईकांच्या आणि मित्रांच्या संपर्कात राहा.त्यामुळे तुमचा तणावमुक्त रहा असे आवाहन त्यांनी शेवटी हसत खेळत केले आहे.
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओमप्रकाश कोयटे यांनी केले तर सूत्रसंचलन सुरेश गोरे यांनी केले आहे तर उपस्थितांचे आभार ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजय बंब यांनी मानले आहे.



