विशेष दिन
कोपरगाव न्यायालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव न्यायालयाच्या पटांगणात तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत नुकताच आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला आहे.जिल्हा न्यायाधीश सयाजीराव को-हाळे,मुख्य न्यायदंडाधिकारी भगवान पंडित यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी,वकील यांनी स्वतः योगासने प्राणायाम,ध्यान करत मोठ्या उत्साहात ‘योग दिवस’ साजरा केला आहे.
दि.२१ जून हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो.योग ही भारताने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. संपूर्ण जगभरात योग दिन साजरा व्हावा यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रस्ताव मांडला होता त्यास त्यांनी मंजुरी दिली असून आता हा दिन जगभर साजरा करण्यात येत आहे.
कोपरगाव तालुका विधी सेवा प्राधिकरण समिती व कोपरगाव वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.योगगुरु संतोष नलगे यांनी योगासन,प्राणायाम,ध्यान या संदर्भात शास्त्रोक्त माहिती सांगितली.राष्ट्रीय योग शिक्षक महेश थोरात,भावना नलगे यांनी योगासनांची प्रात्यक्षिक सादर केले.याप्रसंगी न्यायालयानच्या वतीने योग शिक्षकांचा सन्मानपत्र,शाल,श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला आहे.
यावेळी योग शिक्षकांनी योगासन विषयी प्राथमिक माहिती सांगितली.यानंतर पद्मासन,भुजंगासन,शलभासन, त्रिकोणासन,पर्वतासन,वृक्षासन,पच्छिमोत्तानासन यासह अनेक श्वसनाच्या अभ्यास,प्राणायाम पूर्व तयारी यासह योगा संदर्भात शास्त्रोक्त माहिती देवून त्याचे निरोगी आणि उत्तम आरोग्यासाठी फायदे सांगितले.
यावेळी जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड.अशोक वहाडणे,वकिल संघाचे माजी अध्यक्ष ॲड.अशोक टुपके,कार्यालयीन अधीक्षक दत्तात्रय काकडे,परमजित मंटाला,बंडू बढे,तालुका विधी सेवा समितीचे सागर नगरकर यांचे सह न्यायालयीन अधिकारी आणि कर्मचारी,वकील आदी मान्यवर उपस्थित होते.आंतरराष्ट्रीय योग दिनी योग शिक्षकांकडून मिळालेल्या शास्त्रोक्त माहिती आणि प्रात्यक्षिकाने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले आहे.