अर्थकारण
क्यु.आर.कोड द्वारा व्यवहार करण्यात…या संस्थेचा राज्यात प्रथम क्रमांक-अध्यक्षांचा दावा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सहकारी पतसंस्थांत अग्रणी असलेल्या समता नागरी पतसंस्थेने क्यु.आर.कोड ही सेवा बाह्यमार्गी केल्यामुळे क्यु.आर.कोड वापरणाऱ्या ग्राहकांना बँकेपेक्षा अधिक सुविधा उपलब्ध होणार असून अशा सुविधा पुरविणारी राज्यातील पहिली संस्था ठरली असल्याचा दावा संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी कोपरगावातील एका कार्यक्रमात बोलताना केला आहे.
“भारतातील बँकिंग व्यवहारात ४० टक्के लोक या प्रणालीचा वापर करतात.परंतु अद्याप ६० टक्के लोक या प्रणालीशी जोडले गेलेले नाही.२०१६ साली या प्रणालीची ट्रांझक्शन संख्या केवळ ९३ हजार होती.हा वाढीचा वेग पाहता पुढील २ वर्षात दररोज किमान १०० कोटी ट्रांझक्शन यु.पी.आय द्वारे होतील असा अंदाज आहे”-संदीप कोयटे,संचालक,समता नागरी सहकारी पतसंस्था,कोपरगाव.
समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या ३८ व्या वर्धापन दिनी झालेल्या वार्षिक सर्व साधारण सभेत सेल्फ बँकिंग व क्यु.आर.कोड.प्रणालीचा शुभारंभ विजय नायडू यांच्या शुभहस्ते करण्यात आला.त्या प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
प्रसंगी नेटविन सॉफ्टवेअर प्रा.लि.चे संचालक उत्तम घाडगे,मुख्य कार्यकारी अधिकारी अजित मेनन,मार्केटिंग अधिकारी मसूद अत्तार,डॉ.नरेंद्र भट्टड,शाम जंगम,आय.सी.आय.सी.आय.बँकेचे रिजनल हेड शरद ढगे,जो जोसेफ,जेष्ठ संचालक गुलाबचंद अग्रवाल,अरविंद पटेल,जितूभाई शहा,चांगदेव शिरोडे,कांतीलाल जोशी,कचरू मोकळ,संदीप कोयटे,संचालिका शोभा अशोक दरक आदी प्रमुख मान्यवरांसह संस्थेचे ग्राहक,सभासद,मुख्य कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कोपरगाव येथील समता पतसंस्थेचे कामकाज गेली अनेक वर्ष अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली द्वारे सुरू असून मोबाईल बँकिंग,व्हाउचरलेस बँकिंग,पेपरलेस बँकिंग,फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम,कॉल सेंटर या प्रणालीमुळे समता बँकिंग क्षेत्रात अग्रेसर आहे.त्या तंत्रज्ञानातील यु.पी.आय.प्रणालीच्या माध्यमातून क्यु.आर.कोड द्वारा ही सेवा आधी इनकमिंग पद्धतीने सुरू होती.राष्ट्रीयकृत,खाजगी बँकांपेक्षाही समताचे कामकाज सरस होणार असल्याचा दावा करून ग्राहक,सभासदांना क्यु.कोड द्वारा कोणतेही शुल्क न आकारता इनकमिंग बरोबर आउट गोइंग सेवा देखील मिळणार आहे.या योजनेद्वारे ग्राहकांचे समताच्या खात्यात जमा असलेल्या रकमेच्या आधारे भारतात कुठेही पेमेंट करता येण्याची सुविधा राष्ट्रीयकृत,खाजगी बँका देतात.परंतु त्या बँकांमध्ये खात्यावर जमा असलेल्या रकमेवर २ ते ३ टक्के व्याज दिले जाते.परंतु समता पतसंस्थेच्या ग्राहक,सभासदांना त्यांच्या जमा रकमेवर तब्बल ७ टक्के व्याज मिळणार आहे.तसेच या योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहक,सभासदांसाठी खास बक्षीसे ही देण्यात येणार आहे.या परिपूर्ण प्रणालीमुळे समताची ‘हर घर क्यु.आर.कोड’ योजना मोठया प्रमाणात राबविण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी शेवटी केला आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक संचालक अरविंद पटेल यांनी केले आहे.तर सुत्रसंचालन संजय पारखे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सचिन भट्टड यांनी मानले.