जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
चिंतन

जगण्यालायक शहर निर्देशांक कोणता ?

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

चिंतन

युरोपियन इंटेलिजन्स युनिट या मान्यवर संस्थेने ‘ग्लोबल लिव्हेबिलेटी इन्डेक्स’ असा अहवाल आहे. राहण्यालायक उत्तम शहरं हा त्या अहवालाचा विषय आहे.काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारनेही असा अहवाल प्रकाशित केला होता.त्यात बंगळुरू शहर पहिल्या क्रमांकावर होतं.ताज्या अहवालात मात्र या शहराचा क्रमांक खूपच खाली आहे.ही तफावत लक्षात घेण्याजोगी.म्हणूनच या विषयाचा साकल्याने विचार होण्याची गरज आहे.

जागतिक क्रमवारीत दिल्ली १४०,मुंबई १४१,चेन्नई १४२,अहमदाबाद १४३ आणि भारताने केलेल्या अहवालात प्रथम क्रमांकावर असलेलं बंगळुरू जागतिक निकषांच्या आधारे केलेल्या यादीत १४६ क्रमांकावर आहे.आता बोला! आणि एकूण विचारात घेतलेली शहरं १७२ आहेत.म्हणजे आपण तळाशीच म्हणायला हरकत नाही.कुत्सितपणे काहीजण आपली तुलना सुदान आणि नायजेरियामधल्या शहरांशीही करताना दिसतात.आज आपण सर्वजण रहात असलेल्या शहराचं जीवनमान खरोखरच गेल्या काही वर्षांमध्ये या सर्व निकषांवर सुधारलं आहे का,याचा विचार करण्याची गरज आहे.

आपल्याकडे अनेक लोकांना ‘ग्लोबल लिव्हेबिलिटी इन्डेक्स’ हे काय प्रकरण आहे, हे अनेकांना माहित नाही.सामान्य माणसांचं सोडा,वास्तु विशारद आणि बांधकाम व्यावसायिकांना देखील याबद्दल माहित नाही.आपल्या देशातले अनेक धोरणकर्ते आणि शहराचं नियोजन करणारे अधिकारीदेखील या बाबतीत अनभिज्ञ आहेत.जगण्यालायक शहर तपासणार्‍या ताज्या जागतिक अहवालात काही ठळक नोंदी आहेत.सर्वसाधारणपणे जगण्यालायक शहरांच्या यादीत जागतिक पातळीवरील सुधारणा दिसून येणं अपेक्षित आहे. (कदाचित कोरोनामुळे सामान्य जनता आणि शासन यांच्या जाणिवा आणि प्रयत्न विशेषत्वाने झालेल्या दिसतात.) रशिया-युक्रेन युद्धामुळे पूर्व युरोपमधल्या अनेक शहरांचा स्तर घसरलेला दिसतो.त्याच वेळी पश्‍चिम युरोप आणि कॅनडामधल्या अनेक शहरांमध्ये तो उंचावलेला दिसतो.आपल्या देशातून दर वर्षी स्थलांतरीत होणारे हजारो नागरिक या भागात स्थिरावत आहेत.त्याचं कारण आत्ता उमगलं असेल.तर या सर्वोत्तम शहरांच्या यादीत पॅरीस,व्हेनीस,नेपल,ग्रनाडा,फ्लोरेन्स,रोम या शहरांचा समावेश आहे तर दमास्कस,त्रिपोली हे कायमच या यादीच्या तळाशी दिसतात.तशी व्हिएन्ना,कोपनहेगन,झुरीक, व्हँकुव्हर,जिनिव्हा,मेलबर्न ही शहरं कायम ‘टॉप टेन’मध्ये असतात.तर आशिया खंडातली तेहरान, ढाका,कराची ही शहरं कायमस्वरुपाची तळाशी असतात.
आता असा प्रश्‍न मनात येतो की,ही शहरं कोणत्या निकषांवर तोलली जातात ? शहराच्या स्थैर्यासाठी २५ टक्के गुण दिले जातात.यामध्ये छोटे-मोठे गुन्हे ते लष्करी नियंत्रण अशा अनेक बाबींचा समावेश असतो.आरोग्यासाठी २० टक्के गुण असतात.यामध्ये औषधांची उपलब्धता, सार्वजनिक तसंच खासगी आरोग्य सेवा,त्याचा दर्जा आणि एकूणच स्वच्छतेचा अंतर्भाव आहे. पर्यावरण आणि सांस्कृतिक गुण यासाठी २५ टक्के गुण आहेत.यामध्ये शहराचं तापमान,प्रदूषण, सामाजिक-धार्मिक बंधनं,भ्रष्टाचाराची पातळी,सेन्सॉरशीपचे निर्बंध,विविध प्रकारच्या अन्नपदार्थांची उपलब्धता अशा काही बाबी आहेत.१० टक्के गुण हे शिक्षणासाठी आहेत. यात शिक्षण संस्थांची उपलब्धता,त्यांचे दर आणि दर्जा यांचा समावेश आहे.पायाभूत सोयी सुविधांसाठी २० टक्के गुण आहेत.यात रस्त्यांचं जाळं,सार्वजनिक वाहन व्यवस्था,गृहनिर्माण,उर्जा,टेलिकॉम, दोन शहरांमधला प्रवास आणि घनकचरा व्यवस्थापन अशा गोष्टी आहेत. ही एक अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने विकसीत केलेली पद्धती आहे. म्हणूनच त्याची विश्‍वासार्हता आणि नोंद जागतिक स्तरावर घेतली जाते. एखादी व्यक्क्ती या निकषांवर गुण द्यायला सुरुवात करेल. पण गुणांमुळे मिळणार्‍या नामांकनापेक्षा इतर काही निकष काटेकोर पध्दतीने पाळणं महत्वाचं आहे. म्हणूनच दर वर्षी असा अहवाल जाहीर होतो आणि जागतिक पातळीवर त्याची उत्सुकतेने वाट पाहिली जाते. एखादं शहर जगण्यालायक बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते धोरण,राजकीय इच्छाशक्ती,संसाधन आणि जनतेचा सहभाग.या सगळ्यामधून शहर जगण्यालायक बनत असतं.
एखादं शहर विविध निकषांवर तपासून पाहताना त्यातली धोरणं केवळ त्या शहरापुरती लागू असतात की एकूणच सार्वत्रिक धोरणं उपयोगी पडतात ? याचं उत्तर देणं तसं कठीण आहे. पण सार्वत्रिक धोरण व्यवस्था विशिष्ट शहरांना उपयोगी पडत नाही,असाच अनुभव आहे. जागतिक निकषांवर भारतीय शहरं कशी उतरतात,असा प्रश्‍न इथे उभा राहतो.तर जागतिक क्रमवारीत दिल्ली १४०, मुंबई १४१, चेन्नई १४२,अहमदाबाद १४३ आणि भारताने केलेल्या अहवालात प्रथम क्रमांकावर असलेलं बंगळुरू जागतिक निकषांच्या आधारे केलेल्या यादीत १४६ क्रमांकावर आहे. आता बोला! आणि एकूण विचारात घेतलेली शहरं १७२ आहेत. म्हणजे आपण तळाशीच म्हणायला हरकत नाही. कुत्सितपणे काहीजण आपली तुलना सुदान आणि नायजेरियामधल्या शहरांशीही करताना दिसतात. आज आपण सर्वजण रहात असलेल्या शहराचं जीवनमान खरोखरच गेल्या काही वर्षांमध्ये या सर्व निकषांवर सुधारलं आहे का,याचा विचार करण्याची गरज आहे. प्रश्‍न खंतावण्याचा नाही तर या परिस्थितीत आपण कशी सुधारणा करू शकतो याचा आहे. प्रथम हे मोकळेपणाने स्वीकारू या की आमची शहरं दिवसेंदिवस अधिकाधिक बकाल होत आहेत. आनंदाने जगण्यालायक राहिलेली नाहीत. ही शहरं सुधारण्यासाठी आपण विकासाचं पाश्‍चात्य मॉडेल राबवू शकतो का? तसं केलं तर ती एक फार मोठी चूक ठरेल.
मी गुडगावला जातो तेव्हा याचा पुरेपूर अनुभव घेतो. गुडगावचं तापमान कोरडं आणि गरम आहे. तिकडे अनेकोनेक इमारती काचेने बनवलेल्या आहेत. वनराई अत्यंत कमी आहे. त्यामुळे रस्त्यावरील तापमान वाढतंच पण कार्यालयात आणि घरात काचेच्या तावदानांमुळे एसी जास्त वापरावा लागतो. म्हणजे पुन्हा एसीमुळे होणार्‍या उत्सर्जनाचं प्रदूषण आलं.म्हणजे हे सर्व हानीकारक आणि जगण्याला पूरक आणि पोषक नाही,याच सदरात मोडणार.पाश्‍चात्यांच्या अंधानुकरणामुळे शहराचा सत्यानाश कसा होतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. मग आपलं विकासाचं भारतीय मॉडेल कोणतं ? मागच्या तीस वर्षांमध्ये आपल्याकडे बहुतांशी शहरं वाढली; नव्हे अस्ताव्यस्तपणे सुजली. त्यात आम्ही मेट्रो,मॉल अशी विकासाची चकचकीत उदाहरणं आणली.पण हा विकास ‘माईंडलेस’ आहे का,असा प्रश्‍न धोरणकर्त्यांना आणि शहररचनाकारांना पडू लागला आहे. प्रत्येक शहरापासून दूर जाताना घनकचरा व्यवस्थापन न केल्यामुळे कचर्‍याच्या दुर्गंधीचे डोंगर असतात अन् सांडपाण्याची तजवीज न केल्यामुळे जल,जमीन प्रदूषित होत राहते. लक्षात घ्या,प्रत्येक शहराचा भूगोल वेगळा.गरजा आणि विकासाची गती वेगळी.स्वभाव वेगळा. चंदीगड आदर्श म्हणून त्या धर्तीवर आपण मोहालीचा विकास करायला गेलो अन् स्थानिक संघर्ष उभा राहिला. शहरं श्रीमंतांसाठी उभी राहिली. गरिबाला त्यात जागा आणि सन्मान उरला नाही. म्हणजे देशात लोकशाही आहे, समान हक्क, समान संधी आहे, परंतू शहरात जगण्याच्या बाबतीत लोकशाही नाही.अशी अवस्था निर्माण झाली.
भारत स्वतंत्र होऊन जेमतेम काही दशकं होत आहेत.विकासाच्या बाबतीत अजूनही जागोजाग संघर्ष दिसत आहे. एका वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर पडताना आम्ही वर्गवादाच्या दुसर्‍या वसाहतवादाकडे नकळत आकर्षिले जात आहोत. नवश्रीमंत वर्गाला इथे शोषण करणारा काळा इंग्रज व्हायचं आहे आणि तोच धोरणकर्ता बनत आहे.थोडक्यात, शहरं बिघडण्यामागे पार नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत प्रत्येक पावलावरच्या चुका ठायी ठायी दिसतात. त्यात सरकारी पातळीवर, सांस्कृतिक, सामाजिक पातळीवर, इतकंच काय तर जात पातळीवरही गोंधळ दिसतो.दुर्दैवाने आपल्याकडे नोकरशहा निर्णयकर्ते आहेत.तेच नियोजनकार आहेत.

उदय निरगुडकर,ज्येष्ठ अभ्यासक

जाहिरात-9423439946

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close