अपघात
कारचा अपघात, दोघांचा मृत्यू,दुर्दैवी घटना

न्यूजसेवा
सिन्नर-(प्रतिनिधी)
समृद्धी महामार्गावर इगतपुरी ते शिर्डी टप्प्यात सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात गुरुवारी दि.20च्या मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास स्विफ्ट डिझायर कारचा अपघात झाला आहे.या अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेजण श्रीरामपूर येथील रहिवासी असल्याची माहिती हाती आली आहे.यांपैकी एक जण आरोग्य विभागात कार्यरत होता.कोविड काळात श्रीरामपूर वासीयांना दिलेल्या सेवेमुळे तो कोविड योद्धा म्हणून परिचित होता.
समृद्धी महामार्गावर कि.मी.५६० नजीक असलेल्या गोंदे शिवारात गुरुवारी मध्यरात्री ०१ वाजेच्या सुमारास कार अपघातग्रस्त झाली.तीन ते चार पलट्या खात ही कार दुभाजकाच्या साईड बॅरिकेट्सला धडकून दोन्ही लेनच्या मधोमध जाऊन पडली.त्यात दोन जण गंभीर जखमी होऊन त्यात त्यांचे उपचार करण्यासाठी नेण्यात आले त्यावेळी श्रीकांत भोसले व हर्षद भोसले यांचे निधन झाले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यानी दिली आहे.
श्रीरामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेले आरोग्य कर्मचारी श्रीकांत दत्तात्रय थोरात (वय ३८) रा.अपूर्वा काॅम्प्लेक्स, संजीवन हाॅस्पिटलजवळ,श्रीरामपूर हे मित्र हर्षद शिवाजी भोसले (वय ३७) रा.शिरसगाव, ता.श्रीरामपूर यांच्यासोबत स्विफ्ट डिझायर कार (क्र.एमएच१४ ईवाय ७१९८) मधून इगतपुरी येथील भरवीर इंटरचेंजवरून समृद्धी महामार्गावर शिर्डीच्या दिशेने जात होते.हर्षद भोसले हे देखील थोरात यांचे सोबत कोरोना काळात आरोग्य विभागात चालक पदावर असल्याने दोघांची मैत्री होती.मात्र,श्री.भोसले यांनी खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स चा व्यवसाय सुरू केला होता.त्यांच्याच कारमधून दोघेजण प्रवास करत होते.गुरुवारी मध्यरात्री ०१ वाजेच्या सुमारास कार अपघातग्रस्त झाली.तीन ते चार पलट्या खात ही कार दुभाजकाच्या साईड बॅरिकेट्सला धडकून दोन्ही लेनच्या मधोमध जाऊन पडली.किलोमीटर क्रमांक ५६० वर सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात हा अपघात झाला आहे.
दरम्यान या अपघाताची माहिती मिळाल्यावर गोंदे इंटरचेंज येथील महामार्ग सुरक्षा पोलीस पथक,रस्ते विकास महामंडळाचे मदत पथक तातडीने अपघातस्थळी पोचले. अपघाताची माहिती समजल्यावर वावी पोलीस ठाण्यातील रात्र गस्तीवर असलेले कर्मचारी शैलेश शेलार,देविदास माळी हे देखील तात्काळ अपघातस्थळी पोहोचले.कारमधील दोघा जखमींना मोठ्या प्रयत्नांनी बाहेर काढत टोल नाक्यावरील रुग्णवाहिकेतून सिन्नर ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी नेण्यात आले.मात्र,तेथे पोहोचण्यापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.